

Sangli News : काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिस नायकवडी यांना पक्षश्रेष्ठींकडून विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा होती. पण आता थेट त्यांचा राजीनामाच राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक जमील बागवान यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. तर आमदार नायकवडी यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
इद्रिस नायकवडी यांना पक्षश्रेष्ठींकडून विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी ही सूचना घेऊन मिरजेला आल्याची चर्चा झाली होती. मात्र, या सर्व चर्चा नायकवडी यांनी फेटाळून लावत त्या गोष्टींचा इन्कार केला होता. मला राजीनामा देण्यास सांगितलेले नाही, ह्या सर्व अफवा आहेत, असे म्हटले होते.
इद्रिस नायकवडी यांनी यापूर्वी 2011–2013 मध्ये सांगली-मिरज-कुपवाडचे महापौर असतानाही राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला नडलेले इद्रिस नायकवडी हे आणखी चार वर्षांची आमदारकी सहजासहजी सोडतील, असे वाटत नसल्याची चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, आता नायकवडी यांच्या राजीनाम्याची मागणी सांगलीच्या पदाधिकाऱ्यांकडूनच होताना दिसत आहे. आमदार नायकवडी यांना २ वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला होता, जो संपला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आमदार नायकवडी यांना वरिष्ठ पातळीवरून राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, अल्पसंख्याक समाजाची भीती दाखवून नायकवडी आपला राजीनामा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपदेखील बागवान यांनी केला आहे.
नायकवडी यांच्या राजीनाम्याबाबत अनेक नाराज नेत्यांसह सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची भेट घेणार असल्याचेही बागवान सांगत, दिवंगत अजित पवार हे देखील आमदार नायकवडी यांच्यावर नाराज होते, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी, अजित पवार यांच्यासोबत आपली 27 जानेवारी रोजी भेट झाली होती. त्यावेळी नायकवडी यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी सूचक इशारा दिला होता, असा दावा केला आहे.
या दाव्याबरोबरच बागवान यांनी, नायकवडी यांच्याकडून पक्षविरोधी कारवाया झाल्याचेही पक्षाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे सांगितले आहे. दरम्यान, आता या संपूर्ण घडामोडीनंतर सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र झाल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून हा संघर्ष कसा कमी केला जातो? यासह नायकवडी यांच्या राजीनाम्याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.