

Sangli News : सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. नगरसेविका अश्विनी कोळी यांचे पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. या निर्णयामुळे नगरसेविका अश्विनी कोळी यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मिरजमधील प्रभाग क्रमांक 20 मधून राष्ट्रवादीच्या अश्विनी कोळी नगरसेविका म्हणून विजयी झाल्या आहेत. दरम्यान, आता त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तसेच, पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची प्रत महानगरपालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे.
नगरसेविका अश्विनी कोळी यांनी महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. त्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जागेवरून निवडून आल्या. मात्र, जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लढलेल्या माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी अश्विनी कोळी यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र बनावट आणि संशयास्पद असल्याचा आरोप करत आक्षेप घेतला. याबाबत पारधी यांनी 'अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे' यांच्याकडे रीतसर तक्रार देखील दाखल केली होती.
यानंतर या तक्रारीवर सखोल चौकशी आणि सुनावणी झाली. यानंतर पुणे जात पडताळणी समितीने अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे घोषित केले आहे. तर त्यांच्याकडे पूर्वाश्रमीच्या अश्विनी दत्तात्रय कांबळे या नावाने असलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे.
जात प्रमाणपत्र अवैध ठरवताना पुणे जात पडताळणी समितीने आपल्या आदेशात अश्विनी दत्तात्रय कांबळे यांचा 'कोळी महादेव' अनुसूचित जमातीचा दावा अवैध ठरवला आहे. तसेच, उपविभागीय अधिकारी, पंढरपूर, जि. सोलापूर यांनी दिनांक 23/01/2025 रोजी दिलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करून जप्त करण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे.
या निकालामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अश्विनी कोळी यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आदेशाची प्रत महानगरपालिका आयुक्तांना पाठवण्यात आली असून, ते आता कोणता निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.