माढा (जि. सोलापूर) : माढा तालुक्यातील कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती (Bazar Samiti) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार बबनराव शिंदे (baban Shinde) आणि आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी महाविकास आघाडीने सर्व सतरा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकही जागा जिंकता आलेली नाही. (NCP's Shinde brothers' panel wins in Kurduwadi Bazar Samiti)
आमदार शिंदे बंधूंच्या नेतृत्वाखालील कुर्डूवाडी बाजार समितीतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत आणि माढा लोकसभा शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेल मैदानात उतरला होता. मात्र, शिंदे बंधूंनी एकहाती बाजार समिती जिंकत पुन्हा सत्ता प्रस्थापित केली आहे.आमदार शिंदे बंधूंच्या गटाची एक जागा या अगोदरच बिनविरोध निवडून आलेली आहे.
कुर्डूवाडी बाजार समितीसाठी शुक्रवारी चुरशीने ९६ टक्के मतदान झाले होते. शनिवारी (ता. २९) सकाळी आठ वाजता माढ्यात मतमोजणीस सुरुवात झाली. सहकारी संस्था मतदार संघातील ११ जागांवर आमदार शिंदेच्या पॅनेलने मोठी आघाडी घेतली होती. आमदार शिंदेच्या पॅनेलला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मते मिळाली आहेत, तर विरोधी सावंत यांच्या पॅनेलला अवघी वीस टक्के मते मिळाली आहेत.
ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल तोलार मतदारसंघातही सत्ताधारी शिंदे बंधूंच्या पॅनेलला मोठे मताधिक्य मिळाले आहे. सोसायटी मतदारसंघात बाजार समितीचे विद्यमान सभापती आमदार संजय शिंदे, उपाध्यक्ष सुहास पाटील जामगावकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेले शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांना प्रतिष्ठेच्या लढतीत मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. शिवसेना, भाजप, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनशक्ती, रयत क्रांती, संभाजी ब्रिगेड इतक्या संघटना एकत्रित येऊनही आमदार शिंदे बंधूंच्या विजयरथ रोखता आला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.