

Satara, 15 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने माण तालुक्याचे राजकारण तापले आहे. सोसायटी मतदारसंघातील संभाव्य लढत जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि विद्यमान संचालक शेखर गोरे हे दोघे बंधूच एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे मनोजकुमार पोळसुद्धा नशीब आजमावत आहेत. ही निवडणूक केवळ सत्तेची नसून, ती नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा स्वतः संचालक होण्याच्या उद्देशाने पहिल्यापासून आपली रणनीती आखली होती. त्यांनी सर्व हातखंडे वापरून एक एक सोसायटीचा ठराव आपल्या बाजूने कसा होईल, यासाठी यंत्रणा कामाला लावली होती. या यंत्रणेची अंमलबजावणी सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे यांच्या नेतृत्वाखालील टीम करत होती. त्यावेळी इतर सर्व जण गाफील होते. त्यामुळे बहुतांश ठराव आपल्या विचारांचे करण्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी यश मिळवले आहे.
सोसायटी मतदारसंघात ठराव करताना पहिल्या टप्प्यात विद्यमान संचालक शेखर गोरे यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेत गांभीर्याने हालचाली सुरू केल्या. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत अर्ज दाखल केला. त्यामुळे राजकीय समिकरणे बदलली आहेत, तर मनोजकुमार पोळ यांनीही राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करत या निवडणुकीत उडी घेतली आहे.
लढत तिरंगी की दुरंगी
गेल्या निवडणुकीत तत्कालीन संचालक जयकुमार गोरे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शेखर गोरे आणि मनोजकुमार पोळ यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली होती. दोघांनाही समसमान मते मिळाली होती. यामध्ये चिठ्ठीच्या आधारे शेखर गोरे विजयी झाले होते. मात्र, यंदा खुद्द मंत्री जयकुमार गोरे रिंगणात उतरल्यामुळे स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. मात्र, सद्यःस्थितीत तिरंगी लढत दिसत असली, तरी मनोजकुमार पोळ यांनी माघार घेतल्यास गोरे बंधूंमध्येच प्रतिष्ठेची लढत होणार आहे.
दिग्गज पुन्हा रिंगणात
माण तालुक्यातील अनिल देसाई औद्योगिक, विणकर आणि मजूर संस्था मतदारसंघातून सलग चार वेळा संचालक आहेत, तर सध्या ते बँकेचे उपाध्यक्ष आहेत. या मतदारसंघातून यावर्षी माण तालुक्यातील अनिल शिवाजीराव देसाई, शेखर भगवानराव गोरे यांच्यासह तब्बल २६ जणांचे अर्ज आहेत. माण तालुका सोसायटी मतदारसंघासह नागरी बँका, पतसंस्था या दोन मतदारसंघातून मनोजकुमार सदाशिवराव पोळ यांनी अर्ज दाखल केला आहे.
विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्ग या मतदारसंघातून माण तालुक्यातून भाजपचे अर्जुन चांगदेव काळे व राष्ट्रवादीचे बाळकृष्ण किसन काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इतर मागासवर्गीय सदस्य या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुभाष धनाजी नरळे यांच्यासह शेखर भगवानराव गोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सदाशिवराव पोळ यांचा विक्रम
माण तालुक्याचे किंगमेकर आणि माजी आमदार (स्व.) सदाशिवराव पोळ यांनी माण तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून तब्बल सात वेळा प्रतिनिधित्व केले आहे, तर एक वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. जयकुमार गोरे यांनी २०१५ मध्ये सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लढवत अतिशय अटीतटीच्या लढतीत सदाशिवराव पोळ यांचा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.