
Solapur, 13 February : मोहिते पाटील यांना धोबीपछाड देण्यासाठी जंग जंग पछाडणारे माळशिरसचे माजी आमदार तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय राम सातपुते यांनी मोठा डाव टाकला आहे. आमदार रणजितसिंह माेहिते पाटील यांना ‘शह’ देण्यासाठी सातपुते यांनी मोहिते पाटील कार्डच खेळले आहे, त्यातूनच त्यांनी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मातोश्री आणि पत्नीची मुख्यमंंत्री फडणवीस यांच्यासोबत भेट घडवून आणली आहे, त्यामुळे सातपुते यांनी माळशिरसच्या राजकारणात पुन्हा एकदा जुने पत्ते ओपन केले आहेत.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राम सातपुते (Ram Satpute) यांनी मोहिते पाटील विशेषतः रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. भारतीय जनता पक्षातून आमदार मोहिते पाटील यांची हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी ते आग्रही आहेत. मात्र, राम सातपुते यांच्या त्या प्रयत्नाला अद्यापपर्यंत तरी यश आलेले नाही.
माळशिरसच्या राजकारणात मोहिते पाटील (Mohite Patil) यांना शह देण्यासाठी माजी आमदार राम सातपुते यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षात पुन्हा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभा निवडणुकीनंतर दिलेला आहे. तेही भाजपसोबत जाण्यासाठी इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत माढ्यातील भाजपच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला होता.
भाजपला पर्यायाने राम सातपुते यांना माळशिरसमध्ये एका भक्कम स्थानिक नेत्याची गरज आहे, तर धवलसिंह मोहिते पाटील यांनाही सध्या सत्तेची गरज आहे. त्यातून माळशिरसमध्ये पुन्हा नवे समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. कारण, जिल्हा परिषदेच्या माजी विरोधी पक्षनेत्या पद्मजादेवी मोहिते पाटील आणि धवलसिंहांच्या पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
माजी आमदार सातपुते यांच्या पुढाकाराने ही भेट झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पद्मजादेवी मोहिते पाटील आणि उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी बंद दरवाजाआड तब्बल ४० मिनिटे चर्चा केली आहे. या चर्चेत माळशिरसचे राजकारण, तालुक्यातील अडचणीत आलेल्या सहकारी संस्था याबाबत चर्चा झाली. त्यावर उपाय योजना करण्याबाबत या बैठकी उहापोह करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
धवलसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील यांना मात देण्याचा प्रयत्न राम सातपुते यांचा दिसून येत आहे. त्यात त्यांना किती यश येते, हे लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येणार आहे, त्यामुळे माळशिरसच्या राजकारणात पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
फडणवीस लवकरच अकलूज दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. फडणवीस यांचा तालुक्याच्या वतीने अकलूज येथे नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटनही होणार आहे आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.