

राज्य कृषिमूल्य आयोगाचे उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी धनंजय आणि पंकजा मुंडे हे दोघेही गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार असल्याचे विधान केले, ज्यावर पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन यांनी तीव्र आक्षेप घेतला.
प्रकाश महाजन यांनी पाशा पटेल यांच्यावर संधीसाधू आणि मतलबी नेता असल्याचा आरोप करत, “गोपीनाथ मुंडे यांचा खरा राजकीय वारस फक्त पंकजा मुंडेच आहेत,” असा ठाम दावा केला.
महाजन यांनी भाजपवरही निशाणा साधत, “दुबार मतदार यादी आणि निवडणूक आयोगावरील आरोपांबाबत पक्ष अपराधी भावनेने वागत आहे,” असा टोला लगावला.
Solapur, 03 November : माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे हे दोघेही गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार आहेत, असे विधान राज्य कृषिमूल्य आयोगाचे उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे. त्यावर पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. ‘काय म्हणाले पाशा पटेल?, कोण तो उपटसुंभ? त्याचा काय संबंध? पाशा पटेल यांच्याइतका मतलबी, संधीसाधू नेताच महाराष्ट्रात तुम्हाला सापडणार नाही, अशा शब्दांत प्रकाश महाजन यांनी पाशा पटेल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
आज मी पहिल्यांदा सांगतो. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं होतं, त्यांचं पार्थिव परळीत यायचं होतं. अंतिम संस्कार काय करावेत, याची चर्चा सुरू असताना ‘धनंजय मुंडे यांनी अंतिम संस्कार करावेत,’ असे म्हणणारे हे पाशा पटेल (Pasha Patel) आहेत. हे मी आज तुम्हा सर्वांना सांगतो. त्यांनी आमच्यासमोर येऊन बोलावं. त्यांच्या लक्षात आलं आहे की, आता गोपीनाथराव राहिले नाहीत. त्यामुळे त्यांचं धनुभाऊ धनुभाऊ चाललं आहे, असा टोलाही त्यांनी पाशा पटेल यांना लगावला.
प्रकाश महाजन (Prakash Mahajan) म्हणाले, पाशा पटेल यांना माहिती नाही का? धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे आणि आपल्या बहिणींविषयी (पंकजा, प्रीतम मुंडे) काय उद्गार काढले आहेत. तो कसा काय वारस होऊ शकतो आणि पाशा पटेल हे गोपीनाथ मुंडेंचा वारस कसा काय ठरवणार? पाशा पटेललाच त्याची पोरं वारस ठरवू देतात का बघ म्हणावं.
गोपीनाथ मुंडे यांचा वारस फक्त फक्त पंकजा मुंडेच आहेत, दुसरं कोणीच नाही. इतर कोणाला तो ठरविण्याचा अधिकारच नाही. तो ठरविण्याचा अधिकार हा गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा समाज आणि ओबीसी वर्ग हेच ठरवू शकतात. त्यांनी पंकजा मुंडे ह्याच राजकीय वारस असल्याचे ठरविले आहे, असेही महाजन यांनी नमूद केले.
प्रकाश महाजन म्हणाले दुबार आणि मृत मतदार यादीतून वगळले पाहिजेत, मतदारयादी पारदर्शी केली पाहिजे. पण त्यासाठी लागणारी यंत्रणाच निवडणूक आयोगाकडे नाही. यातील दुबार मतदारांनी दोन ठिकाणी मतदान केले तर ती गंभीर बाब आहे. पण त्याच्यावर कोणी बोलत नाही.
महाविकास आघाडीला राज ठाकरेंच्या रुपाने एक फायर ब्रॅंड नेता मिळालेला आहे. ते त्यांचा उपयोग करून घेत आहेत. भाजप निवडणूक आयोगाचे बाण आपल्या अंगावर का घेतो, हे मलाही कधी कळालेले नाही. कदाचित अपराधाची भावना असेल, म्हणून ते निवडणूक आयोगाचे आरोप अंगावर घेत असतील, असा टोलाही प्रकाश महाजन यांनी भाजपला लगावला.
Q1. पाशा पटेल यांनी काय विधान केलं?
A1. त्यांनी धनंजय आणि पंकजा मुंडे दोघेही गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस असल्याचे म्हटले.
Q2. प्रकाश महाजन यांनी पाशा पटेल यांच्यावर काय आरोप केले?
A2. त्यांनी त्यांना संधीसाधू आणि मतलबी नेता म्हणत त्यांच्या विधानावर टीका केली.
Q3. प्रकाश महाजन यांच्या मते गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारस कोण?
A3. त्यांच्या मते गोपीनाथ मुंडे यांचा एकमेव राजकीय वारस म्हणजे पंकजा मुंडे आहेत.
Q4. भाजपबाबत प्रकाश महाजन यांनी काय म्हटलं?
A4. त्यांनी भाजपवर निवडणूक आयोगावरील आरोप अपराधी भावनेने स्वीकारल्याचा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.