Pandharpur: विधानपरिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने माजी आमदार प्रशांत परिचारक यांना डावलून राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास दाखवला. या निवडणुकीत राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, पण अद्यापही परिचारक समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या नाराजीचा सूर गुरुवारी पंढरपुरात झालेल्या आषाढी एकादशी कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीतच उमटला.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष हरीश गायकवाड यांनी व्यासपीठावरूनच परिचारक यांना आमदारकी देण्याची मागणी करत त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला. हरीश गायकवाड यांनी आपल्या भाषणात, "आमच्या नेत्याकडे लक्ष द्या," अशी थेट मागणी करत प्रशांत परिचारक यांना आमदारकीची संधी देण्याची मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात काही काळ राजकीय चर्चांना उधाण आले.
या मागणीनंतर स्वतः प्रशांत परिचारक यांनी बोलताना समर्थकांच्या मागणीबाबत दिलगिरी व्यक्त केली. "आमच्या चेअरमननी आमदारकीबद्दल मागणी केली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुमचे आणि माझे नाते हे राजकारणापलीकडचे, कौटुंबिक आहे. तुम्ही म्हटले मी मुख्यमंत्री म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री आहात, त्यामुळे त्याचे काही नाही. पाण्याचा शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी काम केले पाहिजे. महाराष्ट्राला पुढील दहा वर्षे तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. देवाभाऊ मोठे झालेले आम्हाला पाहायचे आहे," असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरील विश्वास व्यक्त केला.
यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या विषयावर प्रतिक्रिया देताना परिचारकांच्या सन्मानाबाबत सकारात्मक संकेत दिले. "मार्केट कमिटीच्या चेअरमननी परिचारक यांच्यासाठी आमदारकीची मागणी केली. देवाभाऊंचे परिचारक यांच्यावर कायम प्रेम आहे. त्यांच्याकडे लक्ष आहे आणि योग्य वेळी त्यांचा निश्चित सन्मान केला जाईल," असे गोरे म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली. "परिचारकांबाबत काही टेन्शन घेऊ नका. मी त्याच्या पाठीशी उभा आहे. योग्य वेळी त्यांचा योग्य सन्मान झालेला तुम्हाला दिसेल. त्यांच्या समर्थकांनी केलेली मागणी काही गैर नाही," असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यापूर्वी प्रशांत परिचारक आमदार होते. मात्र, यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने त्यांच्याऐवजी राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली. त्यानंतर परिचारक समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. पंढरपूरातील या कार्यक्रमात ती नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे परिचारकांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.