

MLC Victory Kolhapur Celebration News : राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांची मतमोजणी मंगळवार (२७ ऑक्टोबर) पासून सुरू आहे. पाच जागांपैकी पुणे शिक्षक मतदारसंघाचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित मानला जात असून, शिंदे यांच्या शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार सचिन सानप आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. मात्र, अधिकृत निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. दुसरीकडे, कोल्हापुरात कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या पाचही जागांसाठी गेल्या २८ तासांपासून मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील निकालाचे चित्र मात्र स्पष्ट होताना दिसत आहे. येथे भाजपचे कौस्तुभ गावडे, शिंदे यांच्या शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार सचिन सानप आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात प्रमुख लढत होती.
२८व्या बाद फेरीअखेर गावडे आघाडीवर
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. २८व्या बाद फेरीअखेर गावडे यांना २३ हजार ११७ मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांना १६ हजार ३४७ मते मिळाली आहेत.
या आकडेवारीनुसार गावडे यांनी सानप यांच्यावर ६ हजार ७७० मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. त्यांच्या आघाडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे.
कोल्हापुरात गुलाल उधळून जल्लोष
कौस्तुभ गावडे यांच्या संभाव्य विजयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही जल्लोष करण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला. कौस्तुभ गावडे यांच्या पत्नी मयुरी गावडे यांनी साम टीव्हीशी बोलताना, निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास असल्याचे सांगितले. हा पाच जिल्ह्यांतील शिक्षकांसह आपल्या कुटुंबासाठीही आनंदाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार
कौस्तुभ गावडे यांना मदत करणाऱ्या आणि त्यांच्या विजयासाठी झटणाऱ्या सर्वांचे मयुरी गावडे यांनी मनापासून आभार मानले. तसेच, कौस्तुभ गावडे यांना राज्यातील कमी वयाच्या आमदारांपैकी एक म्हणून बहुमान मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. यापुढे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच कार्यरत राहू, असा विश्वासही मयुरी गावडे यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.