

Kolhapur News : आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर ॲक्शन मोडवर आले आहेत. शिवसेनेचे नेते आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे महानगरपालिकेची सूत्रे हातात दिल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी भाजप आणि काँग्रेसला धक्का देत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला होता. त्यामुळे शहरात पालकमंत्री आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक मातब्बर शिवसेनेत दाखल झाले होते. आता शिवसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे देखील नेतृत्व बळकट करताना दिसत आहेत.
माजी महापौर सरिता मोरे आणि स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे यांच्यासह माजी नगरसेवक, अशा एकूण 16 जणांनी राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. अजित इंगवले, नेपोलियन सोनुले, रमेश भोसले, विवेक महाडिक, माजी परिवहन समिती सभापती अजित मोरे, माजी नगरसेवक रमेश पोवार, सुभाष मोरे, रत्नेश शिरोळकर, माजी सभापती महिला व बालकल्याण समिती मृदुला पुरेकर, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, प्रसाद उगवे, स्मिता माळी, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू हुंबे, रामचंद्र भाले यांच्यासह डॉ. वैभव माळी, प्रवीण लिमकर, दुर्गेश लिंग्रज यांचा समावेश आहे.
वास्तविक पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली महापालिकाची निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) केवळ चार नगरसेवक असल्याने महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पुढे जागा वाटपासंदर्भात शिवसेनेचे अडचण होणार आहे.
दोन महिन्यापूर्वी पालकमंत्री आबिटकर यांनी 34 ते 35 जणांचा पक्षप्रवेश केला. तर आता क्षीरसागर यांनी जवळपास 20 ते 22 जणांचा पक्षप्रवेश केला. त्यामुळे आगामी काळात शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारीवरूनच रस्सीखेच निर्माण होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या मेळाव्यातून थेट महायुतीलाच आव्हान देत 30 जागांवर दावा केला आहे. मात्र, महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना केले आहे.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, कार्यकर्त्याला संधी द्यायचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. कोल्हापूरच्या मतदारांनी ठरवलं आहे की, महायुतीचा महापौर महापालिकेत पाठवायचा. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांच्या विश्वासामुळे शिवसेनेचा जनाधार वाढला आहे. विनाकारण खोटे आरोप करून बदनाम केले जात आहे. आरोपाला कामातून उत्तर द्या. गेली अनेक वर्षे महापालिकेवर सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसला जाब विचारावा,असंही म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.