Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्र्यांच्या सरकारी बंगल्यांवरील खर्चावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. सरकारी तिजोरीतील पैशांची उधळपट्टी होत असून, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेताच नागपूरच्या रविभवन येथील मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.यामुळे राजकीय वातावरण तापण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी अॅक्शन घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याची माहिती त्यांच्या कानावर आली. यानंतर फडणवीसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची ताबडतोब बैठक बोलावली. याच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
एकीकडे लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याचं बोललं जात आहे. अशातच अतिवृष्टीनं कंबरडं मोडलेल्या शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांकडून सरकारवर मोठा दबाव आणला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडे पैसे नसल्याचं कारण दिलं जात आहे. निधीची कमतरता असताना, दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर अनावश्यक खर्च केला जात असल्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.
कोणत्याही मंत्र्याच्या बंगल्यावर 35 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करायचा नसल्याचं निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्यांना सांगितलं आहे. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या बंगल्यावर तब्बल 1 कोटी 10 लाखांचा खर्च केला जाणार होता.मात्र, आता तो खर्च 35 लाखांवरच आला आहे. यावेळी संबंधित मंत्र्यांच्या बंगल्यात इंटिरिअर, डागडुजी, फर्निचर, छताची संपूर्ण दुरुस्ती, टाईल्स बदलणं, इलेक्ट्रिक फिटिंग,दरवाजे,पेंटिंग यांसारखी अनेक कामे केली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी मंत्र्यांच्या सरकारी बंगल्यांवरील खर्चावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. या संदर्भात, रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, सरकारकडे पैसे नसताना बंगल्यांच्या भिंतींना ग्रॅनाइटचे कंपाऊंड कसे लावले जात आहे. दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने केलेल्या चौकशीतही हा खर्च घोटाळा असल्याचे सिद्ध झाले आहे. बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना, ती घेतली नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. या प्रकारात दोषी असलेल्या कार्यकारी अभियंत्यासह इतर अभियंत्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले आहे.
रोहित पवारांनी ट्विट करत त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना उद्देशून आपला आदर आहे आणि या सरकारमध्ये बोटावर मोजण्याएवढेच चांगले मंत्री आहेत. त्यापैकी एक म्हणून नेहमीच आपल्याकडे बघितलं जातं असं म्हटलं होतं. तसेच मी गेल्या सरकारच्या काळातील मंत्र्यांच्या बंगल्यांवरील 30 कोटींची खोटी कामं दाखवून पैसे लाटल्याचा मुद्दा समोर आणला होता.
सरकारच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागाने देखील या संदर्भातला अहवाल तीन महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात दिला आहे. हा अहवाल आपणास पाठवत आहे, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील या प्रकरणात दोषींना लोकशाही पद्धतीने कडक शासन करावे असंही पवार यांनी शिवेंद्रराजे यांना म्हटलं आहे.
मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारी पैशाची कशी उधळपट्टी केली, याची विस्तृत चिरफाड या अहवालात केलेली आहे. एकीकडं सरकारकडे पैसे नाही आणि दुसरीकडं भिंतीना ग्रेनाइट चे कंपाऊंड? विशेष म्हणजे बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते, परंतु बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांचीही परवानगी घेतली नसल्याचं या अहवालात समोर आलं आहे.
तसेच तीन नोव्हेंबर रोजी ट्विट केलं होतं. त्यात केवळ कागदोपत्री काम दाखवून मंत्र्यांच्या बंगल्यावर 30 कोटी रुपये खर्च केल्याचा घोटाळा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणला असता हा मुद्दा मी गेल्यावर्षीच विधानसभेत मांडला होता. आता दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने केलेल्या चौकशीतही हा घोटाळा झाल्याचं सिद्ध झालं आहे.
गतवर्षी मी हा मुद्दा मांडला असता मध्येच उभं राहून मोठ्या तावातावाने आरोप खोटे असल्याच्या पोकळ डरकाळ्या फोडणारे मंत्री गुलाबराव पाटील आता यावर स्पष्टीकरण देतील का? दोषी कार्यकारी अभियांत्यासह इतर अभियंत्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. तत्काळ कारवाई करा अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारची धींड काढल्याशिवाय राहणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.