अहमदनगर - कुकडीच्या पाटपाण्याचा फायदा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे व कर्जत अशा तीन तालुक्यांना होतो. मात्र आवर्तने अनियमित असल्याने पारनेर व कर्जत तालुक्यात राजकीय पक्ष व नागरिक आक्रमक झाले आहेत. कर्जतमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्या नेतृत्त्वाखाली मोठ्या आंदोलनाची तयारी झाली आहे तर पारनेर तालुक्यातील निघोज येथे शिवबा संघटनेकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यात राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. ( Ram Shinde will be aggressive from Kukdi water )
अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण भाग हा दुष्काळी समजला जातो. मात्र कुकडी योजनेमुळे काही भागांत बागायत फुलली आहे. यात पारनेर, श्रीगोंदे व कर्जत तालुक्यातील दक्षिणेकडील पट्टा सुजलाम सुफलाम झाला आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून कुकडीची आवर्तने अनियमित होत आहेत. वर्षांतून किमान चार वेळा आवर्तन अपेक्षित असताना दोन अथवा तीन वेळाच आवर्तन सोडण्यात येत असल्याचे आरोप भाजपकडून होऊ लागले आहेत.
कुकडी प्रकल्पाच्या नियोजन समितीने 25 मार्चला आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे आवर्तन उशिरा सोडण्यात येत असून त्यामुळे पिके पाण्याअभावी जळून जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यातूनच राम शिंदे यांनी कर्जतमध्ये बुधवारी ( ता. 9 ) मोर्चा व आंदोलनाचे आयोजन केले आहे. तर पारनेर तालुक्यातील निघोजमधील शिवबा संघटनेने उद्या ( ता. 8 ) पासून उपोषण आंदोलनाची तर मार्ग न निघाल्यास गुरुवारी ( ता. 10 ) रस्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे.
कुकडी प्रकल्पावरील समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा वर चष्मा आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राज्याचा पाटबंधारे विभाग आहे. अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसची पाटपाण्याच्या प्रश्नावर कोंडी करण्याची तयारी सुरू झाली आहे. कुकडीच्या आवर्तनाचा प्रश्न तीन तालुक्यांतील आगामी निवडणुकांत कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत.
नीलेश लंके यांचे आश्वासन
पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी कुकडीच्या पाणी प्रश्नावर मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार लंके कुकडीच्या प्रश्नावर कसा मार्ग काढणार यावर पारनेर तालुक्यातील दक्षिण भागाचे राजकारण ठरण्याची शक्यता आहे.
रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे आमदार झाल्यापासून कर्जतमध्ये कुकडीच्या आवर्तनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुकडीच्या समितीवर कर्जत तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून श्रीगोंदे तालुक्यातील घनश्याम शेलार यांची नियुक्ती केली आहे. त्यांना कर्जत तालुक्यातील प्रश्न कसे कळणार? कुकडीचे पाणी जामखेड तालुक्याला मिळण्याचे मार्गही आता बंद झाले आहेत.
- सचिन पोटरे, अहमदनगर जिल्हा सरचिटणीस, भाजप.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.