
Ratnagiri Political News : कोकणात दापोली नगरपंचायतीत उद्धव ठाकरे व अनिल परब यांनी तीन वर्षांपूर्वी रामदास कदम व आमदार योगेश कदम यांना शह दिला होता. तसेच येथे सत्ता स्थापन करत रामदास कदम व आमदार योगेश कदम यांना नगरपंचायतीच्या राजकारणापासून दूर ठेवले होते. या गोष्टीचा वचपा आता गृहराज्यमंत्री योगेश कदम काढला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत त्यांनी स्थापन केलेली सत्ताच उलथून टाकण्याची तयारी केली आहे. सत्तेतील 14 नगरसेवकांनाच आपल्या गळाला लावून दापोली नगरपंचायतीत उद्धव ठाकरे गटाला व शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या पदावर गडांतर येण्याची शक्यता असून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
कोकणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगरने जोर धरला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते म्हटल्या जाणाऱ्या अनेक महत्वाच्या नेत्यांना फोडण्यात उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांना यश आले आहे. यात उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय राजन साळवींचा देखील समावेश आहे. साळवींच्या प्रवेशानंतर आता शिंदे गटाने आपला मोर्चा दापोली नगरपंचायतीकडे वळवला असून येथील उद्धव ठाकरे गटाला व शरद पवार गटाच्या सत्तेला खिंडार पाडले आहे.
दापोली नगरपंचायतीमधील उद्धव ठाकरे गटाला व शरद पवार गटातील 14 जणांचा एकत्र गट स्थापन झाला आहे. हे सर्व आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोली शिवसेनेच्या शहर शाखेत प्रवेश केला. मात्र यामध्ये ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पाच नगरसेवक ठाकरे गटाचे नवनगरसेवक यांनी एकत्र येऊन 14 जणांचा वेगळा गट केला आहे. युवा नेते असलेल्या शिवानी खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवक-नगरसेविकांचा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासाठी साऱ्या जोडण्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी लावल्या होत्या.
यानंतर अख्या कोकणात आता भगवा फडकला आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्यासह माझ्या मुलाला राजकारणात संपवण्याचा प्रयत्न केला. पण मी उद्धव ठाकरेंना आज पुन्हा सांगतो, महाराष्ट्रातून त्यांना नाही उध्वस्त केलं, तर रामदास कदम नाव लावणार नाही, असा घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली आहे.
या जगातला असा कोणताच पक्षप्रमुख नाही. जो आपल्याच आपल्याच आमदाराला संपवण्याचा घाणेरडा विचार करत असेल. जो फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात, असाही दावा रामदास कदम यांनी केला आहे. यावेळी कदम, तीन वर्षांपूर्वी याच उद्धव ठाकरे यांनी इथे दापोली, मंडणगडमध्ये काही सुभेदार पाठवले होते. त्यांनी व्यासपीठावरून सगळ्यांची हकालपट्टी केली. व्यासपीठावरूनच त्यांनी काहींच्या नियुक्ती केल्या. पण शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी नव्हती, जी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी केली आहे, असाही आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
यावेळी योगेश कदम यांनी तीन वर्षांपूर्वीचा किस्सा सांगत अनिल परब यांच्यावर तोफ डागली आहे. परब यांनी येथे तीन वर्षांपूर्वी येऊन घाणेरडे राजकारण केलं होतं. शिवसेनेची एक हाती सत्ता येत असताना फक्त मला कमीपणा देण्यासाठी परस्पर हात मिळवणी केली. मात्र आज सत्तेतील 14 नगरसेवकांनी त्यांना योग्य उत्तर दिलं आहे, अशी टीका केली आहे. पुढच्या दोन वर्षात दापोलीचा विकास केला जाईल. दोन वर्षानंतर होणार्या निवडणुकीचा निकाल आजच लागला आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असा हल्लाबोल योगेश कदम यांनी केला.