Sangli, 23 May : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात सांगलीच्या जागेवरून सुरू झालेला वाद मतदानानंतरही थांबायला तयार नाही. आता काँग्रेसने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला बंडखोर नेते विशाल पाटील यांनी उपस्थिती लावल्याने पुन्हा या दोन्ही पक्षात संघर्ष पेटला आहे. विशाल पाटील आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे, तर शिवसेनेच्या मागणीला शहराध्यक्ष पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नुकत्याच झालेल्या लाेकभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत (Sangli) काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यासह सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. त्या स्नेहभोजनाला वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवलेले मूळचे काँग्रेसचे असलेले विशाल पाटील यांनी हजेरी लावली होती. त्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा जुंपली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) आणि विशाल पाटील यांची पक्षाने तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. त्याबाबत संजय विभूते (Sanjay Vibhute) म्हणाले, सांगलीत काँग्रेसने पहिल्या दिवसापासून गद्दारी सुरू केली होती. याबाबत आम्ही स्थानिक पातळीपासून वरिष्ठांपर्यंत तक्रार केली आहे. राष्ट्रवादीने आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली. पण शेवट काय झाला, हे सर्वांनी पाहिले असेल. सुरुवातीला जवळपास ७० टक्के राष्ट्रवादी बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्याकडे गेली. राष्ट्रवादी त्यांच्यासोबत का गेला, हा आमच्या पुढचा प्रश्न होता. उर्वरीत राष्ट्रवादीने उघडपणे भाजपचे काम केले. काँग्रेस शहराध्यक्षांनी घेतलेले स्नेहभोजन अधिकृतपणे गद्दारी केल्याचा पुरावा आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी. विशाल पाटील यांच्यावर अजूनही काँग्रेसने कारवाई केलेली नाही, याचा अर्थ दिल्लीपासून गल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस विशाल पाटील यांच्यासोबत होती का, हे आम्ही म्हणत नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष सर्वांना स्नेहभोजन देतात, त्या स्नेहभोजनाला विशाल पाटील हजेरी लावतात. याचा अर्थ सांगलीत काँग्रेसने अधिकृत गद्दारी केली आहे. ह्याचा पुरावा हे स्नेहभोजन देत आहे. पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी; अन्यथा आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी होणार नाही, हे आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. आमची पक्षातून हकालपट्टी झाली तर चालेल पण या काँग्रेसच्या नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही तोंड पाहू देणार नाही, असा इशारा विभूते यांनी दिला आहे.
त्यांच्या नेत्यांसोबत बंद खोलीत चर्चा करावी
विभूते यांच्या इशाऱ्यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पलटवार केला आहे. ज्यांना दीर्घपल्याचे राजकारण करायचं असतं, त्यांनी एका निवडणूकीवरून असे भाष्य करणे योग्य नाही. अजून पुढे अनेक निवडणुका आहेत. असं सूचक वक्तव्य करत त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांसोबत बंद खोलीत चर्चा करावी, असा सल्लाही काँग्रेस शहराध्यक्ष पाटील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.