

Pandharpur, 21 July : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने चंद्रभागा नदीत गस्त घालण्यासाठी आणि बचाव कामासाठी १८० आपदा मित्रांची पथके नियुक्त केली आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकाने पहिल्याच दिवशी चंद्रभागा नदीत बुडणाऱ्या नांदेडमधील तीन वारकऱ्यांना वाचवले आहे. बचाव पथकातील जवानांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबतची माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील सूरज भारती, गणेश भोकरे आणि सतीश भोकरे हे तीन वारकरी आज (ता. 21 जुलै) सकाळी चंद्रभागा नदीपात्रात 4 नंबर हायमास्ट पोलजवळ स्नानासाठी गेले होते. त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पोहता पोहता त्यांना अचानक दम लागला, त्यामुळे ते तिघे पाण्यात बुडू लागले.
चंद्रभागा नदीपात्रात त्यावेळी बचाव पथकातील जवान गस्तीवर होते. या गस्तीवरील बचाव पथकातील जवानांनी चंद्रभागा नदीत तीन वारकरी बुडत असल्याचे पाहताच तत्काळ पाण्यात उडी घेऊन वारकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना तातडीने उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. सध्या या वारकऱ्याची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपली टीम वारी कालावधीत 24 तास चंद्रभागा नदीपात्रात गस्त घालण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी सज्ज ठेवली आहे. नदीपात्रात 17 रेस्क्यू बोटी, 180 आपदा मित्र व प्रशिक्षित बचावकर्मी तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, वारकऱ्यांनी चंद्रभागा नदी पात्रात उतरताना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.