
Solapur, 09 December : ‘ईव्हीएम’वर संशय घेऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीला उद्या (मंगळवारी, ता. १० डिसेंबर) भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सकाळी साडेदहा वाजता सभा घेणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी मारकडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला होता. त्यानंतर खोत, पडळकर यांची सभा होत असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते (Ram Satpute) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर यांच्यात निवडणूक झाली होती. या निवडणुकीत जानकर हे विजयी झाले आहेत. मात्र, जानकर हे त्यांच्या हक्काच्या गावांतून पिछाडीवर राहिले आहेत, त्यामुळे ईव्हीएमवर संशय घेत मारकडवाडी गावकऱ्यांनी बॅलेट पेपवर मतदान घेण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली हेाती. मात्र, प्रशासानाने परवानगी नाकारत गावात जमावबंदी लागू केली होती.
प्रशासनाने मारकडवाडी गावात जमावबंदी लागू करून आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्यासह गावातील तब्बल 89 गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे मारकडवाडी ग्रामस्थही बॅलेट मतदानासाठी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, विद्या चव्हाण, धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर यांनी रविवारी गावकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही या गावाला उद्या दुपारी भेट देणार आहेत.
शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधातील लढाई दिल्लीपर्यंत नेण्यात येईल, असे सांगितले आहे. पवारांच्या दौऱ्यानंतर आमदार राम सातपुते यांनीही पत्रकार परिषद घेत उत्तर दिले होते. आता सातपुते यांच्या मदतीला आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar), सदाभाऊ खोत हे उद्या (ता. 10 डिसेंबर) मारकडवाडीत येत आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होणाऱ्या आरोपाला उत्तर देण्यासाठी महायुतीचे नेतेही मैदानात उतरले आहेत. ईव्हीएमबाबत सत्य परिस्थिती काय आहे, हे सांगण्यासाठी पडळकर आणि खोत हे उद्या सभा घेणार आहेत. या सभेला माजी आमदार सातपुते हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ‘ईव्हीएम’वरून महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते समोरासमोर येताना दिसत आहेत.
पडळकर, खोत यांच्या सभेची पूर्वतयारी करण्यासाठी माजी आमदार राम सातपुते, गोपीचंद पडळकर यांचे बंधू सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ब्रह्मानंद पडळकर, बाळासाहेब सरगर, नागेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारकडवाडीचे माजी सरपंच विजय मारकड, पांडुरंग चोपडे,आप्पाजी मार्कड यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.