

Kagal News: अकरा वर्षाच्या संघर्षात एकमेकांचं तोंडही न बघणाऱ्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांची नगरपालिकेतील युती कागलकर स्वीकारणार का? असा सवाल या नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीवरून संपूर्ण जिल्ह्याला पडला होता. त्यामुळे कागल नगरपालिकेच्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. तर महायुतीतलेच माजी खासदार संजय मंडलिक यांनी या दोघांच्या युतीसमोर आव्हान उभा केले होते. त्यामुळे घाटगे आणि मुश्रीफ यांच्या अस्तित्वाबरोबरच दोघांच्या युती संदर्भातील प्रतिष्ठेची लढाई मानली जात होती. अखेर या निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे (Samarjit Ghatge) राजे गट यांच्या युतीने.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना पराभूत करूनच आमदार होण्याचा विडा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीत उचलला होता. तब्बल 11 वर्ष मुश्रीफ यांच्या गटाशी संघर्ष करताना कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. मात्र अशा परिस्थितीत नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघे एकत्र आले. कागल नगरपालिकामधून मुश्रीफ- राजे गटाने बाजी मारली. आणि थेट मुश्रीफ यांनीच समरजित घाटगेंना गुलाल लावला. हा क्षण अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता.
कागल नगरपालिकेचा निकाल आज पार पडला. या निकालात कागलकरांनी आपला कौल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या युतीला दिला. नगराध्यक्ष पदा सह 15 जागा या युतीने मिळवल्या. घाटगे मुश्रीफ यांच्या आघाडीच्या विजयानंतर मंत्री मुश्रीफ यांनी थेट घाटगे यांना गाठत विजयी गुलाल लावला.
मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील तो क्षण अनेकांनी डोळ्यात टिपला. उपस्थित कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह विजयापेक्षाही मोठा होता. कारण त्याची पार्श्वभूमीवर तितकीच राज्य आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपटले होते. त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी विजय मिळवला. मागील अकरा वर्षाच्या संघर्षात घाटगे आणि मुश्रीफ एकमेकांच्या वर आरोप प्रत्यारोप करत असताना तितकाच संघर्ष कार्यकर्त्यांनी देखील अनुभवला.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत हाच संघर्ष कार्यकर्त्यांच्या वाट्याला आला. पाच वर्षाच्या कार्यकाळात ईडी पासून ते अनेक कारवायांपर्यंत गेलेले घाटगे यांनी ऐनवेळी महाविकासं आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ही यांच्यातील संघर्ष थांबला नाही. पण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही एकत्र येत कागलमध्ये पुन्हा क्रांती केली.
कागल विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे आठ मतदारसंघ आहेत. या आठ मतदारसंघात मुश्रीफ यांच्या सोबत भाजपचे माजी आमदार संजय घाटगे, समरजित घाटगे राहण्याची शक्यता आहे. तर माजी खासदार संजय मंडलिक हे पुन्हा विरोधात राहण्याची शक्यता आहे.
मुरुगूडच्या विजयानंतर माजी खासदार संजय मंडलिक यांची जी प्रतिक्रिया होती, त्यावरून हे संकेत मिळतात. गोकुळच्या निवडणुकीत चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांना विरोध, लोकसभेचे राजकारण याला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यामुळे आगामी काळात माजी खासदार संजय मंडलिक हे विरोधात राहण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.