

सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करून जत व कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र समित्या स्थापन
वसंतदादा आवार, मिरज बाजार व फळे भाजीपाला बाजाराचा कारभार एकत्र ठेवण्याचा निर्णय
विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासनिक बदल लागू
Sangli APMC News : विष्णू मोहिते
सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनावर आज शिक्कामोर्तब झाला असून कवठेमहांकाळ व जत तालुक्यांसाठी स्वतंत्र कृषि उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. येथील वसंतदादा आवार, मिरज दुय्यम बाजार आवार आणि विष्णूअण्णा फळे व भाजीपाला आवार यांचा कारभार एकत्र असेल. याबाबत जिल्हा उपनिबंधक तथा सहकारी संस्था सांगलीचे अधिकारी सुनिल चव्हाण यांनी आज अधिसूचना जारी केली. ही अधिसूचना जारी होताच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त झाले असून सांगलीसाठी प्रशासकीय मंडळ तर जत व कवठेमहांकाळसाठी प्रशासक नियुक्ती करण्यात आली. राज्यात बाजार समिती विभाजनाबाबतचा हा पहिलाच निर्णय असल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.
राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समित्या’ उपक्रमांतर्गत १७ एप्रिल २०२५ रोजी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व जत तालुक्यांना स्वतंत्र बाजार समिती मिळणार आणि त्यासाठी सांगली बाजार समितीचे बहुप्रतिक्षित त्रिभाजन होणार, असे संकेत मिळाले होते.
त्यानुसार आज निर्णय झाला. जिल्ह्यातील विटा बाजार समितीच्या विभाजन होईल, असेही सांगण्यात आले होते, मात्र कडेगाव येथे स्वतंत्र जागा व यंत्रणा उपलब्ध नसल्याने तो निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. विभाजनापूर्वीचे परवाने, कर्मचारी, करारपत्रे व सुरू असलेली विकासकामे संबंधित नव्या बाजार समित्यांवर बंधनकारक राहणार असून मालमत्ता व दायित्वांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पुढील काळात पूर्ण करण्यात येणार आहे.Sangli Politics
बाजार समितीचा विरोध
सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीने १७ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य शासनाला पत्र पाठवून सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाला विरोध दर्शवला होता. तुलनेत दुष्काळी भागात असलेल्या कवठेमहांकाळ व जत येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन झाल्यास त्या कमकुवत होतील, असा अभिप्राय नोंदविला होता. ते म्हणणे महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने फेटाळले. मंडळाच्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळ बैठकीत विभाजनास मंजुरी देण्यात आली. या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. तरीही, न्यायालयाने कोणताही स्थगिती आदेश दिलेला नसल्याने शासनाचा निर्णय अंमलात आणण्यात येत असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्या बाजार आवारांचा, कोणत्या समितीत समावेश
१) विभाजनानंतर सांगली मुख्य बाजार आवार, सांगली जनावरे बाजार, मिरज येथील शामराव बंडुजी पाटील बाजार, सांगलीतील फळे-भाजीपाला बाजार व सावळी येथील दुय्यम बाजार आवार हे सांगली बाजार समितीकडे राहतील.
२) कवठेमहांकाळ येथील विठ्ठलदाजी पाटील बाजार आवार, ढालगाव येथील बाजार आवार नव्या कृषि उत्पन्न बाजार समिती कवठेमहांकाळकडे हस्तांतरित करण्यात येतील.
३) जत येथील विजयसिंहराजे डफळे बाजार आवार, माडग्याळ येथील बी. आर. शिंदे (काका) बाजार आवार आणि उमदी उपबाजार आवार हे कृषि उत्पन्न बाजार समिती जतच्या अखत्यारित राहतील.
प्रशासकांची नियुक्ती...
विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. सांगली बाजार समितीसाठी जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळ काम करेल. त्यात मिरजेचे उपनिबंधक बिपीन मोहिते सदस्य म्हणून काम पाहतील. कवठेमहांकाळ समिती प्रशासकपदी सहाय्यक निबंधक अनुष्का देशमुख तर जत समितीच्या प्रशासकपदी सहाय्यक निबंधक चेतन जावीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याचिकेवर शुक्रवारी सुनावणी
विद्यमान बाजार समितीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीच बेंच येथे याचिका दाखल केलेली आहे. यावर आतापर्यंत ४ सुनावण्या झाल्या आहेत. पुढील सुनावणी शुक्रवारी ( ता. १०) तारखेला होणार आहे. त्याकडे सर्वाचे लक्ष आहे.
ग्रामपंचायती, सोसायट्यांच्या याचिकेला नकार....
बाजार समित्यांच्या विभाजनाविरोधात ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायट्यांनी ठराव केले आहेत. ते ठराव घेवून बाजार समिती संचालकांनी उच्च न्यायालयात आज अधिसूचनेला स्थगितीसाठी प्रयत्न केला. मात्र ही याचिका दाखल करून घेण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. यामध्ये विद्यमान संचालक सभापती आनंदराव नलवडे, माजी सभापती सुजय शिंदे, महेश पवार, बापूसो बुरसे, शकुंतला बिराजदार, रमेश पाटील आदींचा समावेश आहे.
थोडक्यात महत्वाचे...
* सांगली बाजार समिती विभाजनापुर्वीचे सर्व परवाने सबंधित नविन बाजार समितीचे परवानाधारक
* जे कर्मचारी सध्या उपबाजार समित्यात आहेत. ते तेथेच समजले जातील
* यापुर्वीचे करार, नविन बाजार समित्यांसाठीही लागू
* जुन्या विकास आराखड्याप्रमाणे निधी खर्च होणार
1. सांगली एपीएमसीचे त्रिभाजन का करण्यात आले?
प्रशासन सुलभ करण्यासाठी आणि स्थानिक गरजांनुसार स्वतंत्र समित्या निर्माण करण्यासाठी
2. कोणत्या भागांसाठी नवीन समित्या स्थापन केल्या आहेत?
जत आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांसाठी स्वतंत्र एपीएमसी स्थापन केल्या आहेत
3. कोणते बाजार एकत्र राहणार आहेत?
वसंतदादा आवार, मिरज दुय्यम बाजार आणि फळे भाजीपाला बाजार यांचा कारभार एकत्र असेल
4. विद्यमान संचालक मंडळाचे काय झाले?
ते बरखास्त करण्यात आले असून प्रशासनिक बदल लागू झाले आहेत
5. या निर्णयाचा मुख्य उद्देश काय आहे?
बाजार व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि स्थानिक पातळीवर प्रभावी करण्याचा उद्देश आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.