

Sangli political news : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेवरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत त्यांना दिलासा मिळाल्यानंतर माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी बँकेच्या कारभारावर टीका करत, बँकेचे नुकसान करणाऱ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याचा इशारा दिला.
पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या समर्थकांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयीन (Court) प्रक्रियेनंतर पडळकर यांच्या अर्जाला वैधता मिळाल्याचे खोत यांनी सांगितले. या निर्णयानंतर ईश्वरपूर येथे फटाक्यांची आतषबाजी करून समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, “सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीत माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज अवैध ठरावा, यासाठी जयंत पाटील समर्थकांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयात त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो.”
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावर निशाणा साधताना खोत यांनी बँकेला लुटणाऱ्यांचा आणि बँकेचे नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त आमदार गोपीचंद पडळकर करतील, असा दावा केला. पडळकर या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बँकेच्या संचालकपदावर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या संचालकांविरोधातही न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले. अशा संचालकांना अपात्र ठरवण्यासाठी प्रयत्न करणार असून, हा लढा पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या वैधतेवरून सुरू झालेला वाद आणि खोत यांनी केलेली आक्रमक विधाने यामुळे आगामी निवडणुकीत सहकार क्षेत्रातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.