Gopichand Padalkar's Big Claim : 'बँकेत तारण ठेवलेलं सोनं बनावट अन् साखरेची पोतीही गायब?'; निवडणूक होताच पडळकरांनी गौप्यस्फोटाचा बॉम्ब फोडला

Gopichand Padalkar Alleges Fake Gold At Sangli District Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होताच बाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बँकेत तारण ठेवलेल्या सोन्याबाबत गंभीर आरोप केला आहे.
Sangli District Bank Election; Gopichand Padalkar
Sangli District Bank Election; Gopichand PadalkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १५ जागा बिनविरोध झाल्या असून, जत सोसायटी गटात आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार यांची लढत लक्षवेधी ठरली आहे. दरम्यान, पडळकर यांची जिल्हा बँकेत एन्ट्री होऊ नये, यासाठी जयंत पाटील यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरणार की पडळकर यांची खेळी वरचढ ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल ३ नोव्हेंबरला लागणार असून, जिल्ह्याचे राजकीय तापमान आतापासूनच वाढताना दिसत आहे. अशातच पडळकर यांनी तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत निकालापूर्वीच दोन्ही गटांचे नेते आणि समर्थक विजयाचे दावे करताना दिसत आहेत. त्यामुळे या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पडळकरांचा जिल्हा बँकेत मोठा गौप्यस्फोट

पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा आरोप त्यांनी बँकेची निवडणूक पार पडल्यानंतर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पडळकर यांनी बँकेत तारण ठेवलेले बरेचसे सोने बनावट (डुप्लिकेट) असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच साखरेच्या घोटाळ्याचा आरोप करताना, बँकेकडून साखरेसाठी जे कर्ज देण्यात आले आहे, त्या गोदामांमध्ये साखरेची पोतीच अस्तित्वात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्व गोष्टींची तपासणी करावी, अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे.

Sangli District Bank Election; Gopichand Padalkar
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने जिल्हा बँकेतील अर्ज वैध ठरवला

साखर कारखाने अन् सूतगिरण्या

दरम्यान, पडळकर यांनी साखर कारखाने खरेदी करायचे आणि सूतगिरण्या लिलावात काढायच्या, यालाच सहकार वाचवणे म्हणायचे का? असा सवाल उपस्थित करत आमदार जयंत पाटील यांना लक्ष्य केले.

दुष्काळी पट्ट्यात निवडणूक लादल्याचा आरोप

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा पुढे करण्यात आला होता. मात्र, जत, तासगाव आणि मिरज पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यावरच निवडणूक लादण्यात आली. एकीकडे बिनविरोध निवडणुकीची हाक दिली आणि दुसरीकडे नातलगांना बिनविरोध निवडून आणले. यातून जयंत पाटील यांचा चेहरा किती सुसंस्कृत आहे, हे आता सर्वांना समजले, असा खोचक टोला पडळकर यांनी लगावला. जिल्हा बँकेत आपण गेल्यास सहकार मोडीत निघेल, असा प्रचार केला गेला. बँकेतील कथित गैरव्यवहार बाहेर येण्याच्या भीतीतूनच मला विरोध होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Sangli District Bank Election; Gopichand Padalkar
Gopichand Padalkar : मराठा आंदोलकांनी गोपीचंद पडळकरांची गाडी अडवली : पडळकर म्हणाले, ‘मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा; पण...’

'माझा विजय निश्चित'; पडळकरांचा दावा

पडळकर यांनी आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. या निवडणुकीत कोणी-कोणी काय-काय राजकारण केले, यावर आपण बोलणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. येथील मतदारांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आता बँकेत गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊ, असेही पडळकर यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.