

Tasgaon News : रविंद्र माने
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यात यशस्वी शिष्टाईनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंधरा जागा बिनविरोध झाल्या आहेत.
जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज तालुका सोसायटी गट, तसेच अनुसूचीत जाती आणि भटक्या विमुक्त जाती जमाती या सहा गटांत निवडणक होणार आहे. या ६ जागांवर १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील तासगाव गटात हायव्होल्टेज लढत होणार असून माजी खासदारांच्या समोर माजी महिला आमदाराचे कडवे आव्हान असणार आहे.
तासगाव तालुक्यात पुन्हा रणांगण पेटले असून माजी खासदार संजय पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन पाटील अशी तासगाव तालुका विकास सोसायटी गटातून आमनेसामने आले आहेत. अत्यंत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची अशी ही लढत सुरू झाली आहे.
तासगाव तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोसायटी गटातून ७९ मतदार आहेत. एका सोसायटीने ठरावच दिलेला नाही. गेल्या निवडणुकीतून बँकेचे संचालक बी एस पाटील हे आबा गटातून निवडणून गेले होते. डॉ प्रताप पाटील यांनी गेल्या निवडणुकीतही लढत दिली होती.
मात्र यावेळी त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेतली गेल्या निवडणुकीत मतांची खूप पळवापळवी झाली होती तिरंगी लढतीत बी एस पाटील यांनी बाजी मारली होती. बी एस पाटील यांना ४१ मते मिळाली होती तर काका गटाचे सुनील पाटील यांना २३ मते आणि डॉ प्रताप पाटील यांना १५ मते मिळाली होती. १ मत बाद झाले होते.
गेल्या निवडणुकीत कार्यकर्ते मैदानात आणि नेते त्यांच्या पाठीशी होते यावेळी थेट नेतेच माजी खासदार आणि माजी आमदार निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याने तालुक्यात पुन्हा हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. माजी आमदार सुमन पाटील ह्या उमेदवार असल्यातरी आमदार रोहित पाटील हेच मैदानात असणार आहेत.
तासगाव तालुक्यात अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत चुरस आणि ईर्षा पहायला मिळते. जिल्हा बँकेच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समोरासमोर आले आहे. शिवाय दोन्ही गटाचे नेतेच एकमेकांसमोर उभे राहिल्याने संजय पाटील आणि सुमन पाटील दोघांचाही कस लागणार आहे. अर्ज दाखल झाल्यावेळीच ही लढत होणार ही अटकळ बांधली जात होती. दोन्ही गटाकडून या निवडणुकीसाठी ठराव देण्यापासूनच तयारी करण्यात आली होती.
आमदार रोहित पाटलांची प्रतिष्ठापणाला
तासगाव-कवठे महांकाळ हा सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा पारंपरिक गड मानला जातो. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कडून विजय मिळवून विरोधक माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर काहीसे राजकारणापासून दूर राहत भाजप प्रवेशासाठी चाचपणी करणाऱ्या संजयकाका यांनी आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून मैदानात उडी घेतली आहे. तर त्यांच्या विरोधात दिवंगत आर.आर. पाटील यांच्या पत्नी माजी आमदार सुमनताई आहेत. त्या आमदार रोहित पाटील यांच्या मातोश्री असल्याने आता त्यांचीही प्रतिष्ठापणाला लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.