Sangli Lok Sabha constituency : वसंतदादांच्या कार्याचे, विचाराचे वारसदार विशाल पाटील

Sangli Political News : सांगली लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.
Vishal patil
Vishal patilsarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून तयारी केली जात आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना कामाला लागण्याची सूचना पक्षाने दिली आहे. काँग्रेसमधील कदम, वसंतदादा आणि मदनभाऊ गट एकत्र आले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकवाक्यता दिसून येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. जिल्ह्यात भाजपविरोधी वातावरण असून त्याचा लाभ उठविण्याची संधी काँग्रेसला आहे.

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील शहरी भागातील काही कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत. गेल्या वर्षभरापासून जयंत पाटील विरुद्ध विशाल पाटील असा राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विशाल पाटील यांना जयंत पाटील यांच्याशीही जुळवून घेऊनच निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागेल.

नाव (Name)

विशाल प्रकाशराव पाटील

जन्मतारीख (Birth date)

13 ऑगस्ट 1980

शिक्षण (Education)

बी. कॉम

Vishal patil
Phaltan NCP News : निवडणुका आल्या की, त्यांना पुतळ्यांची आठवण; संजीवराजेंचा खासदार निंबाळकरांवर पलटवार

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विशाल पाटील हे नातू आहेत. माजी खासदार प्रकाशबापू पाटील आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव, तर माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत. विशाल पाटील यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांच्या पत्नीचे नाव पूजा असून त्यांना ईहिता व अरित्रा या दोन मुली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात विशाल पाटील यांचे दादा घराणे हे एकेकाळी महत्त्वाचे मानले जात होते. मधल्या काही काळात पाटील घराणे संघर्ष करत राहिले. तरीही माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांचा राजकीय वारसा पुढे विशाल पाटील यांनी कायम ठेवला आहे. ते सध्या वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

व्यवसाय व शेती.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

सांगली

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

काँग्रेस

Vishal patil
Satara NCP News : जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर वळसे-पाटलांनी बोलणं टाळलं...

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

विशाल पाटील यांनी सर्वप्रथम 2010 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाचे प्रा.सिकंदर जमादार यांनी विशाल यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. विशाल यांच्या विरोधात चुलत बंधू माजी मंत्री मदन पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांनी न खचता राजकीय आणि सामाजिक कार्य सुरू ठेवले. जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील काँग्रेस नेत्यांना पुन्हा एकत्र करून स्वतःचा गट वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर 2015 मध्ये पुन्हा जिल्हा बँकेची निवडणूक लढवत माजी मंत्री मदन पाटील यांचा पराभव केला. 2010 मधील पराभवाचे त्यांनी उट्टे काढले. त्यानंतर जिल्हा बँकेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. पुढे झालेली 2021 मधील जिल्हा बँकेची निवडणूक त्यांनी एकतर्फी जिंकली.

विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली.काँग्रेसच्या हक्काची जागा गेल्यामुळे विशाल पाटील यांना माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत औपचारिक प्रवेश करून निवडणूक लढवली. भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी ही निवडणूक लढवली होती. विशाल पाटील यांना 3 लाख 40 हजार 871 मते मिळाली. मात्र, त्यांना 1 लाख 60 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे नातू विशाल पाटील यांचे राजकारण व समाजकारणात मार्गक्रमण सुरू आहे. आजोबा वसंतदादा आणि वडील प्रकाशबापू यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा मोठ्या तळमळीने, मेहनतीने पुढे नेत आहेत. राज्यातील सर्वात मोठा असणारा साखर कारखाना चालविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते, ते त्यांनी पेलून दाखविले. त्यांच्यावर अनेकांचे राजकीय वार झाले. परंतु, राजकीय चाणक्यनीती दाखवित मोठ्या हिंमतीने त्यातून ते बाहेर पडले. विशाल पाटील यांनी उद्योग क्षेत्रात ही आपल्या नावाचा आगळावेगळा ठसा उमटविला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासह या सर्व उद्योगांत त्यांनी जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात 2019 व 2021 मध्ये मोठा महापूर आला. त्यावेळी अनेक ठिकाणी पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर विशाल पाटील स्वतः पाण्यात उतरले होते. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यासह सांगली शहरातील बहुतांश पूरग्रस्त गावांना त्यांनी अन्न धान्य व संसारोपयोगी साहित्य दिले. कोरोना संसर्गातही ते मागे हटले नाहीत. कोविड सेंटरची उभारणी करून लोकांना कोरोना काळात सेवा दिली. सॅनिटायझर सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिले.

वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय (पीव्हीपीआयटी) या अभियांत्रिकी महाविद्यालयाला राज्यातील एक दर्जेदार शैक्षणिक संकुल बनवले आहे. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी 'मी सक्षमा' सारखे अनोखे व्यासपीठ सुरू केले आहे. यातून सांगली शहरातील तसेच जिल्ह्यातील महिलांना मोठा वाव मिळत आहे. हे व्यासपीठ आणखी मोठे करण्याचा त्यांचा मानस आहे. वसंतदादांच्या कार्याचा आणि विचारांचा खरा वारसदार म्हणून विशाल यांच्याकडे पाहिले जाते.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

सांगली लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेत तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांना तब्बल दोन लाख 40 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे काँग्रेसला निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदा सांगलीची जागा गमवावी लागली. मोदींचे वादळ शमविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने काही घटक पक्षांना बरोबर हरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2019 मध्ये सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली. काँग्रेसच्या हक्काची जागा गेल्यामुळे विशाल पाटील यांना माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवली. पाटील यांच्यापुढे भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि वंचित बहुजन आघाडी कडून गोपीचंद पडळकर यांनी आव्हान निर्माण केले होते. या निवडणुकीत विशाल यांना 3 लाख 40 हजार 871 मते मिळाली. मात्र त्यांना एक लाख 60 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election) :

सांगली लोकसभेसाठी आगामी निवडणुकीचे दावेदार असलेले विशाल पाटील यांना 2019 मधील निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. 2019 मध्ये विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटननेच्या चिन्हावर निवडणूक लढवली. पाटील यांच्यापुढे भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली होती. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय वैर महाराष्ट्राला परिचित आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांना कोंडीत पकडले. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असली तरी जयंत पाटील यांनी दादा घराण्याचे उट्टे काढले. राष्ट्रवादीच्या दुसऱ्याखा फाळीतील नेत्यांनी तसेच सांगली महानगरपालिका क्षेत्रातील काही नगरसेवकांनी वरकरणी काँग्रेस आघाडीचे काम करत असल्याचे दाखवले, प्रत्यक्ष मतदान करताना मात्र राष्ट्रवादीची मते भाजपच्या पारड्यात पडल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीने अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत केल्याचे निवडणुकीच्या निकालात दिसून आले.वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी देखील लाखांमध्ये मतदान घेतले. त्याचा ही फटका बसला.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

वसंतदादांचे नातू म्हणून केवळ कौटुंबिक वारसाच त्यांना लाभला नाही, तर विचार, कृतिशीलता, लोकसंग्रह, संघटनकौशल्य, लोकोपयोगी कामांचा ध्यास या सर्व बाबींचा वारसाही लाभला. जिल्ह्यावर वर्षानुवर्षे दादा घराण्याचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दादा गट अस्तित्वात आहे. जिल्ह्यातील लोकांचे दादा घराण्यावर विशेष प्रेम आहे. परंतु लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत, तेथील लोकांचे प्रश्न अथवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संपर्क वाढविण्याची गरज आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

विशाल पाटील यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली असल्याने ते सुशिक्षित आहेत. याशिवाय पाटील यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. फेसबूक आणि व्हाॅट्सअपच्या माध्यमातून अनेक ग्रुप विशाल पाटील यांनी तयार केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी साखर कारखाना, जिल्हा बँक आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवीत आहेत. अवकाळी पाऊस,अतिवृष्टी आणि जत तालुक्यातील सिंचनाच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली आहेत. त्याचा प्रसारही सोशल मीडियाद्वारे त्यांचे कार्यकर्ते जोमात करत असतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

राजकीय वारसा असलेले विशाल पाटील हे जिल्ह्यातील आक्रमक युवा नेते म्हणून ओळखले जातात. रोखठोक बोलणे त्यांचा स्वभावगुण असल्याने बहुतांश वेळा पक्षातील नेत्यांना त्यांचे म्हणणे रुचत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी अनेकवेळा त्यांचे मतभेद झाले. जयंत पाटील विरुद्ध विशाल पाटील असा राजकीय संघर्ष सुरू आहे. जयंत पाटील यांच्यावर अनेक वेळा जोरदार प्रति हल्ला करीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न विशाल यांनी केला.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील.

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

वसंतदादा साखर कारखाना आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून विशाल पाटील यांनी शहरी आणि ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवला आहे. त्यांचा स्वतःचा मोठा गट आहे. आजही बहुतांश कार्यकर्ते दादा घराण्याशी निष्ठावंत आहेत. सांगली मतदारसंघात भाजपने नियोजनबद्ध मांडणी सुरू केली आहे. कै. पतंगराव कदम यांचे पुत्र आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री मदन पाटील यांच्या वतीने जयश्री पाटील तसेच जतचे काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी मतभेद असले तरी निवडणुकीसाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

Vishal patil
Vishal Patil News : वसंतदादांचं स्वप्न सांगलीतील तीन 'व्ही' एकत्र येऊन साकारणार; विशाल पाटलांनी थोपटले दंड!

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

काँग्रेसमध्ये उमेदवारी विशाल पाटील यांना निश्चित मानली जात असली तरी त्यांच्याकडून मात्र विशेष तयारी सुरू असल्याचे दिसत नाही. सांगली लोकसभेची दुरंगी लढत होणे काँग्रेससाठी फायद्याचे ठरेल, असे संकेत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. तिरंगी लढत झाली तर भाजपला फायदा होऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी ‘एमआयएम’ने पत्ता ओपन केला तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. मतांचे ध्रुवीकरण करून काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी हा डाव खेळला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

लोकसभेसाठी विशाल पाटील यांना उमेदवारी पक्षाने त्यांना कामाला लागावे, अशा सूचना देखील दिल्या आहेत. काँग्रेसमधील कदम, वसंतदादा आणि मदनभाऊ गट एकत्र आले आहेत. ते जिल्हा बँकेत बसून लोकांशी संपर्क साधत आहेत. मात्र, ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार बदलल्यास माजी मंत्री विश्वजित कदम किंवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत हे उमेदवार होऊ शकतात. त्यामुळे विशाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यास ते सांगली विधानसभा मतदारसंघावर ठामपणे दावेदारी सांगतील, हे मात्र निश्चित आहे.

(Edited By Roshan More)

Vishal patil
Maan Political News : 'ते' ज्यांना टिळा लावतील 'ते' साताऱ्याचे खासदार होतील!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com