Ajit Pawar : सांगली महापालिकेनंतर ZP मध्येही अजितदादा चाणाक्षपणे उतरले; सत्ता कोणाचीही आली तरी राष्ट्रवादी ठरणार 'किंगमेकर'

Sangli Zilla Parishad Election : सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चाणाक्ष मांडणी केली असून भाजप शतप्रतिशत प्रयत्नात आहे, तर काँग्रेस मोजक्या जागांवर ताकदीने लढताना दिसते.
Political leaders during Sangli Zilla Parishad election preparations as BJP, NCP (Ajit Pawar), Congress and Shiv Sena finalize seat strategies ahead of high-stakes local body polls.
Political leaders during Sangli Zilla Parishad election preparations as BJP, NCP (Ajit Pawar), Congress and Shiv Sena finalize seat strategies ahead of high-stakes local body polls.Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Zilla Parishad Election : सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची राजकीय पटमांडणी जवळपास स्पष्ट झाली आहे. आता लक्ष लागले आहे ते संभाव्य बंडखोरीकडे. बहुतांश पक्षांनी उमेदवार निश्चित केले असून, जागावाटपात दोन पावले मागे येण्याचे धोरण सर्वच पक्षांनी स्वीकारल्याचे चित्र आहे. भाजपने काही जागा युतीतील छोट्या पक्षांसाठी सोडण्याची रणनीती अवलंबली असून, भाजपविरोधात बहुतांश ठिकाणी एकास एकचा पॅटर्न यावेळीही दिसतो आहे. त्यामुळे लढत चुरशीची ठरणार, हे स्पष्ट आहे.

‘शत्-प्रतिशत’ भाजपचा प्रयत्न

भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यात विस्तार झाला आहे. विविध पक्षांतील नेत्यांनी भाजपत प्रवेश केल्याने युती करताना पक्षांतर्गत नाराजी व बंडखोरीचा धोका निर्माण होतो, असे गणित मांडत भाजपने ‘शत्-प्रतिशत भाजप’चा प्रयत्न केला आहे. मात्र, काही ठिकाणी रयत क्रांती, काही ठिकाणी शिंदे गटाची शिवसेना, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीला जागा देत तडजोड करण्यात आली आहे. राज्यातील युतीत असलेले व स्थानिक मांडणीला मान्यता देणारे निशिकांत पाटील, गौरव नायकवडी आदी गटांना भाजपने सोबत घेतल्याचे चित्र आहे.

काँग्रेसचा मोजक्या जागा, ताकदीने लढण्यावर भर

काँग्रेसने स्वतःच्या संघटनात्मक ताकदीचा अंदाज घेत मोजक्या पण प्रभावी जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. पलूस व कडेगाव तालुक्यात सर्व जागांवर आमदार विश्वजित कदम यांचे उमेदवार मैदानात आहेत. जतमध्ये तडजोड अपरिहार्य ठरल्याने काँग्रेसने पाच जागा घेतल्या आहेत. मिरजेत सात जागांवर अजितराव घोरपडे यांना सोबत ठेवण्यात आले आहे.

वाळव्यात जयंत पाटील काँग्रेसला जागा देण्यास तयार नसल्याने बोरगाव येथे जितेंद्र पाटील यांच्यासारख्या जुन्या काँग्रेसीला लढण्याची मोकळीक देण्यात आली आहे. येळावीत विशाल पाटील समर्थक अमित पाटील यांच्यासाठीही अशीच भूमिका घेतली आहे. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी व भाजपसमोर काँग्रेस थेट उभी राहणार आहे. काँग्रेस सुमारे 25 जागांवर निवडणूक लढवत आहे. खानापूर कवठेमंहाकाळ तालुक्यातही उमेदवारी दिली आहे.

दादांची राष्ट्रवादी पटमांडणीत हुशारी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जिल्हाभरात पटमांडणी करताना रणनीतिक हुशारी दाखवली आहे. तासगाव तालुक्याची पूर्ण जबाबदारी माजी खासदार संजय पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना ‘फ्री हँड’ देत त्यांच्या प्रभावक्षेत्रात मिरज पूर्व भागातील 2 जागाही देण्यात आल्या आहेत.

जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांना तीन जागा, आटपाडीत एक जागा, शिराळ्यात समान संधी, तर वाळव्यात जयंत पाटील यांच्याशी न जमल्याने भाजपच्या कोट्यातून एक जागा घेत ‘किंगमेकर’ची भूमिका साधण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाचीही काठावर सत्ता आली तर आपले महत्त्व वाढले पाहिजे, अशीच ही रचना असल्याचे दिसते.

शिवसेना ठरतीय भाजपची डोकेदुखी

महापालिका निवडणुकीत युतीपासून दूर ठेवण्यात आलेल्या शिवसेनेला आता सत्तेसाठी महापालिकेत भाजपकडून महत्त्व दिले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेना भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसते आहे. शिवसेनेने 32 जिल्हा परिषद व 50 पंचायत समिती गणांत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. खानापूरमध्ये 4, आटपाडीत 3 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार थेट भाजपशी एकास एक लढत देत आहेत. हे शिवसेनेचे प्रभावक्षेत्र असून, येथील यश सेनेला जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणात निर्णायक स्थान मिळवून देऊ शकते.

Political leaders during Sangli Zilla Parishad election preparations as BJP, NCP (Ajit Pawar), Congress and Shiv Sena finalize seat strategies ahead of high-stakes local body polls.
Sangli NCP News : जयंत पाटलांच्या सांगली राष्ट्रवादीतही लवकरच फेरबदल

‘जनसुराज्य’ संधी शोधतोय

माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करत काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार दिले होते. त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. जिल्हा परिषदेतही समित कदम यांनी काही ठिकाणी स्वतंत्र पट मांडला आहे. शिराळ्यात भाजप आमदार सत्यजित देशमुख यांची कन्या जनसुराज्यकडून लढणार असून, संखसारख्या मतदारसंघातही पक्ष ताकदीने उभा राहणार आहे. आरग पंचायत समितीत काँग्रेससोबत मांडणी करत ‘मेरिटला वाव’ हे धोरण पक्षाने स्वीकारले आहे.

Political leaders during Sangli Zilla Parishad election preparations as BJP, NCP (Ajit Pawar), Congress and Shiv Sena finalize seat strategies ahead of high-stakes local body polls.
Sangli ZP : सांगलीत जिल्हा परिषदेत महायुतीचा पेपर सोपा, महविकासचं मताधिक्य घटल्याने टेन्शन वाढलं

नेते तालुक्यात अडकणार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी मिळत आहे. मतदारसंघ मोठे असल्याने सभा, मेळावे आणि संपर्क मोहीम वाढणार आहे. प्रमुख नेते आपल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करतील. राज्यात फक्त बारा जिल्ह्यांत निवडणूक होत असल्याने राज्यातील बड्या नेत्यांच्या सभांची संख्या यावेळी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com