
सावळज जिल्हा परिषद गट 1978 पासून आर. आर. आबा गटाचा बालेकिल्ला आहे. येथूनच दिवंगत आर. आर. पाटील यांनी राज्याच्या राजकारणापर्यंत धडक मारली. या गटातून आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील परंपरागत राजकीय प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. यावेळी काय घडणार, याचे आखाडे बांधले जात असले तरी लढतीचे स्वरूप आरक्षण निश्चित झाल्यानंतरच ठरेल.
सावळज जिल्हा परिषद गट हा 1978 मध्ये दिवंगत आर. आर. पाटील येथून निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चेत आला. याच गटातून तालुक्याचे आमदार म्हणून आर. आर. पाटील पुढे आले. 1978 पासून आजपर्यंत सावळज जिल्हा परिषद गट हा आर. आर. गटाचा बालेकिल्ला ठरला आहे.
आर. आर. आबांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत माजी आमदार सुमन पाटील, सुरेश पाटील यांनी हा गट नेटाने राखून ठेवला आहे. हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी आता आमदार रोहित पाटील यांच्यावर आली आहे. आतापर्यंत आर. आर. आबांनंतर जिल्हा परिषदेसाठी वसंत सावंत, किशोर उनउने, प्रवीण धेंडे, कल्पना सावंत, चंद्रकांत पाटील आणि सागर पाटील यांनी या गटाचे नेतृत्व केले आहे. यापैकी प्रवीण धेंडे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची पाच वर्षे संधी मिळाली होती, तर चंद्रकांत पाटील यांचे निधन झाल्याने त्यांचा मुलगा सागर यांना पोटनिवडणुकीत नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.
पंचायत समिती गणातून सावळज पंचायत समितीसाठी मनीषा माळी, तर डोंगरसोनी गणातून वायफळे येथील शुभांगी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या. आता जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त तालुक्यातील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी आर. आर. पाटील गट आणि माजी खासदार संजय पाटील गट आमने-सामने येणार, हे निश्चित आहे. निवडणुकीचे पडघम वाजत असले, तरी अद्याप निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली नाही. आरक्षणे निश्चित झालेली नाहीत. मात्र जिल्हा परिषदेसाठी महिला आरक्षण पडण्याची शक्यता आहे. तथापि, आरक्षणे निश्चित झाल्यानंतर लढतीचे स्पष्ट होईल.
सावळज गटात दोन गण (1) सावळज. त्यामध्ये सावळज, अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, नागेवाडी ही गावी आहेत (2) डोंगरसोनी. त्यामध्ये डोंगरसोनी, वायफळे, जरंडी, दहिवडी, सिद्धेवाडी, यमगरवाडी ही गावे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.