

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात आमदार जयकुमार गोरे यांनी महायुतीलाच आव्हान दिलं असून भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी देखील सुरु केल्याचं चित्र आहे. त्यामुळं जिल्हा परिषद निवडणुकीतील ड्राम्यानंतर आता या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात? याकडंही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्यास भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजय मिळवेल. तसेच निवडणुकीच्या तोंडावर आणि आचारसंहिता काळात बँकेत झालेल्या भरती व बढत्या बेकायदेशीर असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महायुतीमधील तीन पक्षांमध्येच जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. विशेषतः भाजपने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढवून बॅंक ताब्यात घेण्याच्या प्रयत्न सुरु आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या सबुरीच्या सल्ल्यानं राजकारण चांगलंच पेटलं आहे. सातारा जिल्हा बॅंकेत राजकारण आणू नका. ज्या जिल्हा बँकांमध्ये अवाजवी राजकारण शिरले आहे, त्या बॅंका मोडकळीस निघाल्याचं सांगताना शेतकरी, सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी सातारा जिल्हा बॅंकेची स्थापना झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताठी बॅंका टिकवणे हीच सर्वांची प्राथमिकता असायला हवी. त्यासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून काम केले पाहिजे, असा सल्लाही उदयनराजे भोसले यांनी दिला. या विधानाने भाजपच्या नेत्यांच्या महत्वकांक्षेला मुरड घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असूनही भाजपने फोडाफोड करत झेडपीची सत्ता काबीज केली होती. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत स्थानिक नेत्यांनी अजूनही मौन पाळले आहे. स्थानिक नेत्यांनी तर त्याबाबत भाष्य करणेही टाळले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे नुकतेच मूळगावी दरे इथं येऊन गेले. त्या ठिकाणी बोलताना त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीबाबत मोठे भाष्य केलं होतं. "आता सर्वांनी एकत्रितपणे महायुती म्हणून निवडणुका लढवल्या पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे," असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.
पण भाजपच्या स्वबळाच्या घोषणेमुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. बॅंकेत राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद मोठी आहे. मात्र, भाजपची जिल्हा परिषदेतील तिरकी चाल पाहून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सामूहिक पॅनेलबाबत चर्चा केली आहे. मात्र, त्याबाबतची गाडी अजूनही रुळावर आल्याचं दिसत नाहीए.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून येत्या ०१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २५ सप्टेंबर रोजी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, सुरभी भोसले यांच्यासह ०६ प्रमुख नेत्यांनी आपले अर्ज भरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.