Purushottam Jagtap : ‘सोमेश्वर’मधील पराभवानंतरही पुरुषोत्तम जगतापांची संघर्षाची भूमिका : ‘एका पराभवाने कुणी संपत नाही अन्‌ आपण तर अजिबात संपलेलो नाही...’

Someshwar Sugar Factory Result : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीने 21-0 विजय मिळवला. पराभूत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी लक्ष्मीदर्शनाचा आरोप करत एका पराभवाने संपणार नसल्याचे सांगत पुढेही संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
Purushottam Jagtap
Purushottam JagtapSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune, 13 October : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने २१-० असा विजय मिळविला. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना चॅलेंज देणारे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या संपूर्ण पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, पराभवामुळे आपण खचून जाणारे नाही. एका पराभवाने कुणी संपत नाही आणि आपण तर नाहीच नाही. कदाचित समोरून अफाट लक्ष्मीदर्शन झाले, त्यामुळे आपला कागदावर पराभव झाला आहे. आपण अजिबात संपलेलो नाही. मात्र, यापुढेही याच भूमिकेवर लढत राहू, अशी प्रतिक्रिया पुरुषोत्तम जगताप यांनी निकालानंतर दिली.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनाही मुरूम-वाल्हे गटातून विद्यमान संचालक तथा माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. शिंदे यांनी जगतापांचा 6464 मतांनी पराभव केला आहे. शिंदे यांना १३ हजार ९३५ मते, तर जगताप यांना ७ हजार ३२६ मते मिळाली आहेत.

कारखाना निवडणुकीतील पराभवावर अध्यक्ष जगताप यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेला निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. अचानकपणे निवडणुकीत भूमिका घ्यावी लागली. लढाई कठीण होती. मात्र शेतकरी सभासदांच्या हिताची भूमिका लढलो, याचे समाधान आहे.

या भूमिकेपाठी व्यक्तिगत कोणताही हेतू नव्हता. शेतकरी सभासदांच्या हिताच्या जपणुकीसाठी ही भूमिका होती. यापुढेही याच भूमिकेने कार्यरत राहू, अशी ग्वाही देतो. आमच्या पाठीशी पाठबळ उभे करणाऱ्या, आम्हाला मतदान करणाऱ्या सर्व शेतकरी सभासद यांचे मनापासून आभार आणि विजयी उमेदवारांना शुभेच्छा, असेही जगताप यांनी म्हटले आहे.

निवडणुकीत साथ देणाऱ्या सहकाऱ्यांना उद्देशूनही त्यांनी संदेश दिला आहे. त्यात पुरुषोत्तम जगताप यांनी म्हटले आहे की, मित्रांनो, खेळ असो वा निवडणूक हार-जीत ठरलेली असते. पराभव समोर दिसत असतानाही आपण कसे लढतो, हे महत्वाचे असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना हेच शिकवले होते. तशाच पद्धतीने आपण सगळे मनापासून लढलात.

Purushottam Jagtap
Prashant Paricharak : प्रशांत परिचारकांनी वेळेत टाकलेला डाव ठरला ‘जॅकपॉट’; ‘ती’ 41 मते ठरणार निर्णायक

अपुरी साधन सामग्री, अत्यंत अपुरा वेळ, आर्थिक ताकद नाही, बडे लोक सोबतीला नाहीत तरी सर्वसामान्य लोकांना घेऊन आपण संस्थेच्या हिताची, सत्याची लढाई लढलो. शेतकऱ्यांचा प्रपंच शेतकऱ्यांच्या हाती रहावा या वैचारिक भूमिकेतून लढलो. आपण प्रत्येक सभासदापर्यंत प्रामाणिकपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. आपले उमेदवारही निष्कलंक व कोरी पाटी होते. ऐनवेळी त्यांनी साथ सोबत करत अत्यंत भक्कम साथ दिली. स्वाभिमानी सभासदांनी अशा वादाळातही साथ दिली, हे आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आहे.

निवडणुकीत कदाचित आपली आर्थिक ताकद कमी पडली किंवा समोरून अफाट लक्ष्मीदर्शन झाले किंवा अन्य राजकीय-सामाजिक कारणे असो आपला कागदावर पराभव झाला आहे. आपण बलाढ्य शक्तीसमोर, यंत्रणेसमोर, आर्थिक ताकदीसमोर हरलो आहोत. त्यामुळे जे सभासद आज सोबत आले नाहीत, त्यांच्याबाबत आपल्याला राग नाही. उलट आपणच कमी पडलो, असे समजूयात, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे.

जगताप म्हणाले, एक मात्र निश्चित की, एका पराभवाने कुणी संपत नाही आणि आपण तर नाहीच नाही. क्रांती किंवा परिवर्तन एका रात्रीत होत नाही. आपण अशा पराभवाने खचून जाणारे नाही. यापुढे शेतकऱ्यांसाठी, आपल्या वाडवडिलांनी उभारलेल्या कारखान्यासाठी, कारखाना वाचविण्यासाठी लागेल ते कष्ट घेऊ. हजारो शेतकरी कुठलाही पक्ष नसताना, गट नसताना कारखाना हितासाठी सोबत आले, हे काय थोडे आहे?

Purushottam Jagtap
Solapur Dcc Bank : ‘दक्षिण’मध्ये DCC बॅंकेच्या सोसायटी मतदारसंघात हसापुरे पॅटर्न पुन्हा एकदा ठरला पॉवरफुल्ल; सर्वच हरकती फेटाळल्या...

आज ना उद्या अंतिमतः सत्याचा विजय होतो. त्यामुळे आपण अजिबात संपलेलो नाही. उलट ही एक नवी सुरवात आहे असे समजू. अंधार पडतो तेव्हा तर पुढे पहाट फुटणार असते...वाईटातून चांगले घडते. आपण स्वच्छ असल्याने भगवान ‘सोमेश्वर’ आपल्या पाठीशी आहेच. सर्व साथ-सोबत करणारे सहकारी, लढाऊ उमेदवार, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हजारो स्वाभिमानी सभासद, हितचिंतक या सर्वांचे मनापासून आभार, असे जगताप यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com