

Satara News: मुंबईतील मध्यस्थीनंतर काहीशी निवळली. त्यातूनच सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रित ताकद दाखवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. मात्र, निवडणुकीपूर्वी सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण निवडणुकीनंतरही सुरुच असल्याचे दिसत आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेली सत्तेची रस्सीखेच कराडच्या राजकीय नेतृत्वासाठी संधीची नवी दारे उघडणारी ठरणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, यापेक्षा कराडचा नेता या खुर्चीवर विराजमान होणार का, याचीच उत्सुकता राजकीय वर्तुळात लागुन राहिली आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या एकत्रित लढतीबाबत साशंकता होती. महाविकास आघाडीचे नेतेही या अंतर्गत मतभेदांचा फायदा घेण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या टप्प्यात सोसायटी मतदारसंघाचा अपवाद वगळता महायुतीने एकजूट दाखवली आणि सर्व जागांवर विजय मिळवला. आता भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेनेचे चार संचालक असे संख्याबळ असताना अध्यक्षपदावरून महायुतीतच सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी आपला अनेक वर्षांचा सत्तेचा अनुभव पुढे करीत थोरलेपणाचा दावा करीत आहे, तर भाजप संचालकांच्या संख्याबळाचा आधार घेत अध्यक्षपदावर हक्क सांगत आहे. त्यामुळे महायुतीतील मोठा भाऊ कोण, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळाल्यास मंत्री मकरंद पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अशा परिस्थितीत अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे नाव आघाडीवर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी अंतर्गत गटबाजी आणि दावेदारांची स्पर्धा असली, तरी आमदार डॉ. अतुल भोसले यांचे नाव सर्वसमावेशक पर्याय म्हणून पुढे येऊ शकते. त्यामुळे दादा का बाबा यांना संधी मिळणार याचीही उत्सुकता कऱ्हाड तालुक्याला लागलेली आहे.
त्यातच अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांनी दावा केला तरी कऱ्हाडकडेच संधीचे पारडे झुकण्याची शक्यता आहे. मात्र, ही संधी प्रत्यक्षात आणण्यासाठी पक्षीय गणिते, वरिष्ठ नेत्यांची सहमती आणि संचालकांची एकजूट महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे कराडच्या राजकीय नेतृत्वासाठी ही निवड प्रतिष्ठेची ठरणार आहे.
दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबईतून निर्णय होण्याचे संकेत दिले असताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्थानिक नेत्यांच्या चर्चेतून निर्णय होईल, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा फैसला स्थानिक नेतृत्व करणार की वरिष्ठ नेत्यांचा आदेश निर्णायक ठरणार, याकडे लक्ष लागले आहे. महायुतीची एकजूट टिकवायची की पक्षीय वर्चस्वासाठी संघर्ष करायचा, याची कसोटी आता अध्यक्ष निवडीत लागणार आहे.
सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद केवळ सहकार क्षेत्रातील सत्तेचे केंद्र नाही, तर जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढवणारी महत्त्वाची राजकीय खुर्ची आहे. त्यामुळे कराडमधील दोन प्रभावी नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत येणे ही स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड आहे. अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना संधी मिळाल्यास राष्ट्रवादीच्या माध्यमातून कराडच्या राजकीय वारशाला नवे बळ मिळू शकते. तर आमदार डॉ. अतुल भोसले अध्यक्ष झाल्यास भाजपचे कराडमधील भाजपचे राजकीय वर्चस्व अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.