

Satara ZP : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे याच्या अपहरण आरोपात अटकेतील जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उदय इवारे यांनी जामीन मंजूर केला आहे. यावेळी वैद्यकीय तपासणी अहवालात पोलिसांनी देसाई आणि मांडवे यांना मारहाण केल्याच्या आरोपांना प्राथमिकदृष्ट्या आधार असल्याचे न्यायालयाने नमूद केले. कोठडीत मारहाण केल्याच्या कारणावरून सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि तपासी अधिकारी अरूण देवकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीमध्ये साताऱ्यात अभूतपूर्व गोंधळ झाला. निवडणुकीच्या आदल्या रात्री जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांचा मुलगा विकास शिंदे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यामध्ये वडिलांचे अपहरण करण्यात आले असून, त्यांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले होते, तसेच त्यामध्ये अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्यासह काही जणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. ही गोष्ट समजल्यानंतर बापू शिंदे यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात व वाई उपअधीक्षक कार्यालयात जाऊन आपले अपहरण झाले नसल्याचे सांगितले होते.
दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्व सदस्य वाहनातून एकत्रित जिल्हा परिषदेत आले. यावेळी जिल्हा परिषद इमारतीमध्ये अगोदरच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी संदीप मांडवे व अनिल देसाई यांना पकडले. तिथून दोघांना महाबळेश्वर पोलिस ठाण्यात नेले होते. तेथे अटकपूर्व वैद्यकीय तपासणीत प्रकृती बिघडल्याचे समोर आल्याने दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना महाबळेश्वर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारी वकील, दोन्ही सदस्यांचे वकिलांचे व या प्रकरणातील पीडित पक्षाचे म्हणणे न्यायालयाने ऐकले.
त्यानंतर न्यायालयाने केस डायरी, रिमांड अर्ज व वैद्यकीय कागदपत्रांचा आढावा घेतला. सदस्यांच्या वकिलांनी २० मार्चला अटक केल्याचा दावा करताना न्यायालयात उशिरा हजर केल्याचे सांगितले. पोलिसांच्या वतीने दोघा सदस्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती; परंतु सुनावणीदरम्यान पीडित पक्ष म्हणजे ज्यांचे अपहरण झाले होते, त्यांनीही सरकारच्या म्हणण्याला दुजोरा दिला नाही, तसेच वैद्यकीय अहवालात सदस्यांवर अत्याचार झाल्याचे संकेत मिळत असल्याने पुढील पोलिस कोठडी देणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला.
मारहाणीच्या आरोपांना आधार : तपास अधिकाऱ्याला नोटीस
सुनावणीदरम्यान दोन्ही सदस्यांच्या वकिलांनी पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली. त्यानंतर न्यायालयात देसाई व मांडवे या दोघांचे जबाब नोंदवून घेतले. यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेत घडलेला सगळा प्रकार व पोलिसांनी कसे गैरकृत्य केले, हे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर झाल्यानंतर त्यात जखमा असल्याचे दिसून आले. त्यामुळे मारहाणीच्या आरोपांना प्राथमिकदृष्ट्या आधार मिळत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक आणि तपासी अधिकारी अरुण देवकर यांना नोटीसही बजावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.