

Solapur, 27 March : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जादुई बहुमत गाठून दोन्ही पदांवर आपली मोहोर उमटवली. मात्र, पोलिसांकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीमुळे ही निवडणूक राज्यभर गाजली. त्यावर ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केले. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, तशी ती झाली नाही, अशी कबुली गोरे यांनी प्रथमच दिली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती निवडल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाष्य केले.
गोरे म्हणाले, सातारा झेडपी (Satara ZP) निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे, असे आम्ही सातत्याने सांगत होतो. महायुती म्हणून आम्ही झेडपीचे पदाधिकारी निवडीचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आमचा मोठा पक्ष असल्याने भाजपचा अध्यक्ष व्हावा, अशी आमची भूमिका होती आणि तो झाला.
समविचारी सदस्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे साताऱ्यात आमच्याकडे बहुमत आहे. ज्या पद्धतीने निवडणुका होणे अपेक्षित होतं, पण त्या तशा झाल्या नाहीत. या निवडणुकीत लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप झाला नाही पाहिजे, अशी भूमिका निवडणूक आयोग घेत असतं. साताऱ्यामध्ये मात्रं तसं घडलेलं नाही, असेही गोरेंनी कबूल केले.
ते म्हणाले, सातारा झेडपीची निवडणूक असताना दोन दोन मंत्री तिथे गेले. खूप मोठा जमाव तेथे गेल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अपहरणाचा प्रयत्न झाला होता, त्यातील आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यातून हे सर्व घडले.
कायदा राखणं, जसं पोलिसांचे काम आहे. तसेच, लोकप्रतिनिधींचा आदर ठेवणे हे देखील त्यांचं काम आहे. पण, लोकप्रतिनिधींनी देखील कायद्याची बूज राखली पाहिजे, कायद्याचं पालन केलं पाहिजे. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला नाही पाहिजे. आपण रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो. त्याप्रमाणे आपण कायदा पाळला तर मोडायची वेळ येत नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना लगावला.
सोलापूरच्या विषय समित्यांबद्दल बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले, सोलापूरकरांनी भाजपला भरभरून प्रेम दिलं आहे. आम्ही शेतकऱ्याच्या मुलाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं आहे. सभापतिपदासाठी सामाजिक, प्रादेशिक समतोल साधला आहे.
संस्कृती सातपुते, ॲड अमृता वाघे, चेतनसिंह केदार-सावंत आणि रामप्पा चिवडशेट्टी यांना सभापतिपदाची संधी दिली आहे. भाजपच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य लोकांना संधी दिली आहे. धनगर, मराठा, ओबीसी सर्व समाजाला सोबत घेऊन न्याय देण्याची भूमिका भाजपची आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
अशोक खरात प्रश्नावर गोरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सूचना दिल्या आहेत, त्यांचे या प्रकरणावर बारकाईने लक्ष आहे. खरात प्रकरणात जे जे दोषी आहेत, त्या कोणालाही सोडले जाणार नाही. हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आहे. जे लोक सामील आहेत, ज्यांनी फसवणूक केली, त्यांना सोडले जाणार नाही.
अशोक खरात प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत, राजकीय नेत्यांनी तो तपास करू नये. या प्रकरणात जो दोषी असेल, तो कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळे कोण काय म्हणतंय, त्याला आरोपी म्हणता येणार नाही, असेही गोरे यांनी नमूद केले.
पंचनाम्याची सूचना
गोरे म्हणाले, अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत तीव्रतेनुसार प्रशासन निर्णय घेईल.
निर्बंधाबाबतचा निर्णय परिस्थितीनुसार : गोरे
कॅन बाटलीमध्ये पेट्रोल, डिझेल देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. त्याबाबत गोरे म्हणाले, एका नाण्याला दोन बाजू असतात. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की, आपल्याकडे इंधनाचा तुटवडा नाही. लोकांमध्ये संभ्रम झाल्याने 2 लिटर ऐवजी 10 लिटर पेट्रोल भरलं जात आहे. त्यातून इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न होतोय आणि हे थांबलं पाहिजे. पेट्रोल-डिझेल विक्रीच्या निर्बंधाबाबतचा निर्णय परिस्थितीनुसार प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.