

Satara, 04 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महायुती म्हणून लढविण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी रात्री महायुतीच्या नेत्यांची बैठक होऊनही जागावाटपाचा तिढा अजून सुटू शकलेला नाही. मात्र, महायुतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झाले असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही त्याबाबत सूतोवाच केले आहे. सोसायटी मतदारसंघातील ११ जागा प्रत्येकाने आपापल्या हिम्मतीवर लढायच्या. पण उर्वरीत राखीव १० जागांच्या वाटपावरच महायुतीचं भवितव्य निश्चित होणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. जिल्ह्यातील आम्ही चारही मंत्री, दोन आमदार व दोन खासदार एकत्रच आहोत. बॅंकेतील ११ सोसायटीच्या जागेत कोणालाही मागे घ्या, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे उर्वरित राखीव १० जागांच्या वाटपाचे सूत्र ठरविताना कोणत्या पक्षाचे किती ठराव त्या प्रमाणात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नेते अर्जांच्या छाननीनंतर एकत्र बसून यावर चर्चा करून निर्णय घेणार आहोत, अशी माहिती शिवसेना नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी रात्री महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची शहरातील हॉटेलमध्ये खलबतं झाली. त्याबाबत मंत्री देसाई यांच्याकडून पत्रकारांनी नेमकी काय चर्चा झाली, हे जाणून घेतले.
मंत्री देसाई म्हणाले, शुक्रवारी रात्री आमची जिल्हा बॅंकेतील जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली. राज्यस्तरीय नेत्यांनी आमच्यासह आमच्या सर्व खासदार व आमदारांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार आम्ही जिल्हास्तरावर एकत्र बसू महायुती म्हणूनच निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे.
जिल्हा बॅंकेतील ११ विकास सेवा सोसायटींच्या ११ जागांवर कोणी कोणाला मागे घ्या, असे म्हणू शकत नाही, त्यामुळे उरलेल्या राखीव १० जागा राहतात. त्या कशापद्धतीने लढायच्या याचे सूत्र ठरलं आहे. त्यात ज्या प्रमाणात ठराव आहेत, त्या प्रमाणात जागा वाटप होईल. भाजपचे ठराव किती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठराव किती, शिवसेनेचे ठराव किती याची आकडेवारीनुसार त्याप्रमाणात या राखीव जागांचे सूत्र ठरवायचे आहे.
शिंदेंच्या शिवसेनेच्या ठरावांची आकडेवारी माजी सभापती रामराजे काढणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठरावाचा आकडा मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, तसेच भाजपच्या ठरावांचा आकडा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले काढणार आहेत.
काल ठरल्याप्रमाणे उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी आहे. त्यानंतर एकत्र बसून आकडेवारीनुसार कोणाचे किती ठराव याची चर्चा केली जाणार आहे. त्यातून एकत्र बसून जागांचे वाटप असे करायचे हे ठरविले जाणार आहे. बैठकीत जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
...म्हणून जयकुमार गोरे बैठकीला अनुपस्थित
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना जाणूनबुजून लांब ठेवले जात आहे का, या प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा सोलापूर दौरा झाल्यानंतर उपाय योजना चांगल्या व्हाव्यात, टॅंकरची चांगली व्यवस्था होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार मंत्री गोरे हे रोजच्या रोज तेथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ते जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. या प्रक्रियेत जिल्ह्यातील आम्ही चारही मंत्री, दोन आमदार व दोन खासदार एकत्र आहोत. जागा वाटपाची एक बेसलाईन ठरवून राखीव दहा जागांचा तिढा सोडवायचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.