

Satara, 13 February : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६५ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि शिवसेनेने १५ जागा जिंकून झेडपीची सतता हाती ठेवण्यात यश मिळविले आहे. या झेडपी निवडणुकीत अनेकांनी जुने हिशेब चुकते केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सातारा जिल्हा बॅंकेत झालेला पराभवाचा वचपा काढला आहे. सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणे यांचा पराभूत करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना धोबीपछाड देत जिल्हा बॅंकेतील पराभवाचा बदला घेतला आहे.
जावळी तालुक्यातील कुसुंबी जिल्हा परिषद गटात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी, जिल्हा परिषद माजी सदस्या अर्चना रांजणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कविता ओंबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. त्याला कारणही खास असेच होते.
अर्चना रांजणे यांचे पती ज्ञानदेव रांजणे यांनी सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि बडे नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. रांजणे आणि शिंदे यांच्यात जिल्हा बॅंकेसाठी सोसायटी मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. दोन्ही गट मतदानाच्या दिवशी एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्या पराभावासाठी संपूर्ण ताकद रांजणे यांच्या पाठिशी लावली होती. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना धक्कादायकरित्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या निवडणुकीत सहकाराचे राजकारण होते, त्यामुळे त्यावेळीही अनेकांनी एकमेकांचे जुने हिशेब चुकते केले होते.
दरम्यान, कुसुंबी गटातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अर्चना रांजणेंच्या विरोधात कविता ओंबळे यांना उतरवले आणि जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील शिवेंद्रराजेंचे सर्व हिशेब चुकते करण्यासाठी शिंदेंनी सर्व ताकद पणाला लावली. एका सर्वसामान्य कार्यकर्तीच्या माध्यमातून शशिकांत शिंदेंनी जिल्हा बॅंकेतील पराभवाचा बदला घेतला.
जावळी तालुक्यातील सर्वपक्षीय विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना शशिकांत शिंदे यांनी जिल्हा बॅंकेतील पराभवावर भाष्य केले. कुसुंबी गटात पराभूत झालेल्या उमेदवार अर्चना रांजणे यांचे पती आणि जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यावर बोलण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी करताच आमदार शिंदेंनी रांजणे यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
सातारा जिल्हा बँकेत माझा पराभव झाल्यावर काही लोकांना हात आकाशाला टेकल्याचा भास होत होता. जन्म देणाऱ्या बापाला ते विसरले होते. मात्र, एका सामान्य कार्यकर्त्याने त्यांचा पराभव करून जिल्हा बँकेतील माझ्या पराभवाचा वचपा काढला, असा टोला शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे आणि रांजणे यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.