
Kolhapur News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला वेग घेतला आहे. शिवसेनेकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. मात्र, भाजपच्या गोटात हालचाली अजूनही मंदावलेल्या दिसतात. एकीकडे कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपची जबाबदारी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते.
मात्र, पुन्हा एकदा ही जबाबदारी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे आली आहे. पुन्हा एकदा पाटील हे कोल्हापूरच्या मैदानात उतरले असून त्यांनी थेट महायुतीतून भाजपला 33 जागांवर दावा केला आहे. गतवेळच्या निवडणुकीत याच 33 जागांवर भाजप आणि ताराराणी आघाडीचे उमेदवार निवडून आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. महापालिकेतील भाजप- ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांशी संवाद साधत मागील विजयी झालेल्या 33 जागांवर भाजप आग्रही असून, आणखी जागांवर सक्षम उमेदवार असल्यास आणखी जागा घेऊन महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.
एकीकडे शिवसेनेकडून शिवसेनेचाच (Shivsena) महापौर करूया अशा पद्धतीची घोषणा केली जात आहे . तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील महायुतीचा महापौर करण्याची घोषणा केल्याने चर्चेला आणखी वाव मिळाला आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच माजी नगरसेवकांसोबत प्राथमिक बैठक घेतली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, प्रा. जयंत पाटील, महेश जाधव, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते. प्रत्येकाशी स्वतंत्रपणे बोलून निवडणुकीसाठी पक्षाकडून काहीही कमी पडणार नसल्याने माजी नगरसेवकांनीही त्याच ताकदीने तयारीला लागावे, असे सांगितले.
भाजप सक्षमपणे महानगरपालिका निवडणुकीत उतरणार असून, मागील विजयी ३३ जागांवर आग्रही आहे. इतर ठिकाणी सक्षम उमेदवार असतील तेथे महायुतीकडून आणखी जागा मागून घेऊ. कोणत्याही स्थितीत कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.
तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील, असे स्पष्ट केले. ‘केंद्र व राज्यातील सत्तेमुळे महानगरपालिकेत सत्ता आल्यास कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होईल’, असा विश्वास माजी नगरसेवकांनी व्यक्त केला.
काँग्रेस- 30
राष्ट्रवादी- 15
शिवसेना- 04
ताराराणी आघाडी- 19
भाजप- 13
एकूण जागा – 81
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.