Lok Sabha Election 2024 : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या एक उच्चशिक्षित तरुण आमदार आहेत. वयाच्या 28 व्या वर्षी त्या पहिल्यांदा सोलापूर शहर-मध्य या विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. 2009 पासून त्या सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. पहिल्या निवडणुकीत त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता.
प्रणिती शिंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीच्या आमंत्रित सदस्य आहेत. दांडगा जनसंपर्क, मनमिळावू पण, प्रसंगी धाडसी आणि आक्रमक होण्याचा स्वभाव, प्रभावी वत्कृत्व या गुणांमुळे प्रणिती यांनी वडिलांप्रमाणेच अल्पावधीत स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. प्रणिती शिंदे यांची एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून राज्यात ओळख आहे. (Latest Marathi News)
प्रणिती सुशीलकुमार शिंदे
9 डिसेंबर 1980
बीए, एलएलबी
आमदार प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या तृतीय कन्या आहेत. त्यांच्या आईचे नाव उज्ज्वला शिंदे असे आहे. प्रणिती शिंदे या अविवाहित आहेत. त्यांच्या कुटुंबात जात-पात या गोष्टींना थारा नाही. स्वत: सुशीलकुमार शिंदे यांनी उज्ज्वला महाजन यांच्याशी प्रेमविवाह केला. प्रणिती यांना प्रीती आणि स्मृती या दोन मोठ्या बहिणी असून दोघीही विवाहित आहेत. प्रणिती शिंदे यांचे शिक्षण मुंबई झाले असून त्यांनी कला शाखेच्या पदवीवर आहेत. त्यानंतर त्यांनी एलएलबीची पदवी प्राप्त केली.
प्रणिती शिंदे यांच्या कुटुंबात वडील सुशीलकुमार शिंदे, आई उज्ज्वला शिंदे आणि प्रणिती या तिघांनी राजकीय आखाड्यात निवडणूक लढवून आपले नशीब आजमावले आहे. यामध्ये उज्ज्वला शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी उपराष्ट्रपती आणि खासदारकीच्या दोन निवडणुकांमध्ये पराभवाचा अनुभव घेतला. मात्र, राजकीय प्रवासात त्यांचा उल्लेख एक यशस्वी आणि मुरब्बी राजकारणी म्हणूनच केला जातो. आता प्रणिती शिंदे यांनीदेखील आपली विजयाची घौडदौड कायम ठेवली आहे.
प्रणिती शिंदे या पूर्ण वेळ राजकारणी असून, त्या एक समाजसेविकाही आहेत.
सोलापूर
काँग्रेस
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. 2009 मध्ये पहिल्यांदा त्या सोलापूर मध्य या मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यानंतर सातत्याने सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे विधानसभेत नेतृत्व केले आहे. मात्र यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून माघार घेतल्याने आता प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत.
राजकारणात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी जाई-जुई विचारमंचच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले. पहिल्या निवडणुकीवेळी सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी पुढील 2 निवडणुकीत मात्र स्वत:च्या कामातून छाप पाडत आपली ओळख निर्माण केली. 2014 मध्ये मोदी लाटेत आणि त्यानंतर 2019 मध्येही त्यांनी स्वकर्तृत्वावर विजय खेचून आणला आहे. दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे या 'इंडिया' आघाडीच्या संभाव्य उमेदवार असणार आहेत.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांना पराभव पत्कारावा लागला होता. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. म्हणूनच आता प्रणिती शिंदेंना लोकसभेच्या रणांगणात उतरून वडिलांच्या पराभवाचा बदला घ्यायची संधी चालून आली आहे. जाई-जुई विचार मंच आणि पुढे आमदार म्हणून महिला सबलीकरण, तरुणांचे प्रश्न, रोजगार निर्मिती यासह उपेक्षित, शोषित कामगार वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात. मात्र, शहरी भागाचे नेतृत्व करणाऱ्या प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असताना ग्रामीण जीवनात डोकावून पाहावे लागणार आहे. तेथील शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न आणि समस्या समजून घेऊन त्यांच्या विश्वासास पात्र ठरावे लागणार आहे.
राजकारणात येण्यापूर्वी प्रणिती शिंदे यांनी जाई-जुई विचार मंच ही सामाजिक संस्था स्थापन केली होती. त्या माध्यमातून त्यांनी तरुणवर्ग आणि कामगार वर्गासाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे, महिला कामगारांच्या प्रश्नांवर आंदोलने, तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधार आणणे, याशिवाय आमदार म्हणून देखील समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. प्रणिती शिंदे यांचे विडी कामगार महिलांचे प्रश्न, रोजगाराच्या आणि आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष योगदान आहे. या महिलांना स्वंयरोजगार निर्माण व्हावा यासाठी शिलाई मशीन वाटप करणे, रोजगार मेळाव्यांचे आयोजन करणे यासारखी सामाजिक कामे त्यांनी पार पाडली आहेत. सुशिक्षित बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे.
लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. 2019 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.
निवडणूक लढवली नाही.
प्रणिती शिंदे या एक उत्तम वक्तृत्वकौशल्य असलेल्या मनमिळावू स्वभावाच्या लोकप्रतिनिधी आहेत. जाई-जुई विचार मंचच्या माध्यमातून त्यांचा शहरी आणि ग्रामीण भागात चांगला संपर्क आहे. सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागामुळे त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. धाडसी निर्णय क्षमता असल्याने जनतेमध्ये त्यांच्याबद्दल एक प्रकारची क्रेझ निर्माण झाली आहे. शिवाय घरातूनच राजकारणाचे धडे मिळाले असल्याने त्यांच्या जनसंपर्काच्या कक्षा अधिकच रुंदावल्या आहेत. मतदारसंघातील छोटे-मोठे कार्यक्रम शिबिरे, उदघाटन समारंभ अशा कार्यक्रमाला प्रणिती शिंदे यांची उपस्थिती असल्याने जनतेमध्ये आपुलकीची भावना आहे. वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय अनुभवामुळे आणि संपर्कामुळे आपसूकच प्रणिती शिंदे यांचा जनसंपर्क प्रभावी असल्याचे दिसून येते.
वैयक्तिक स्तरावर मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच उपलब्ध असतात. तसेच जनवात्सल्य, जाई-जुई निवासस्थान आणि कार्यालयातही मतदार अथवा मतदारसंघाबाहेरील कोणीही व्यक्ती त्यांची व्यथा, समस्या प्रणिती शिंदे यांना थेट भेटून सांगू शकतो. तसेच त्या समस्यांचे तत्काळ निराकरण होत असल्याने त्यांच्या प्रसिद्धीत अधिकच भर पडली आहे. मात्र, काही वेळा प्रणिती शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकांमुळे चहापेक्षा किटली गरम असा अनुभव जनतेला येत असल्याने जनसंपर्कात बाधाही निर्माण होत असल्याची चर्चा होते.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण असा विस्तृत मतदारसंघ आहे. प्रणिती शिंदे यांचा जनसंपर्काच्या कक्षा या शहरी भागातच रुंदावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना ग्रामीण भागातही कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करावे लागणार आहे. भेटीगाठी वाढवून ग्रामीण भागातील जनसंपर्क अधिक वाढवणे गरजेचे आहे
प्रणिती शिंदे या एक ग्लॅमरस राजकारणी आहेत. तसेच त्या स्वत: उच्चशिक्षित असल्याने सोशल मीडियाचा वापर आणि त्याचे होणार फायदे याबद्दल त्या अधिक जागरूक आहेत. त्यामुळेच प्रणिती शिंदे यांच्यासह त्यांच्या कामाची,त्यांच्या राजकारणाची आणि पक्षाची ध्येयधोरणे या संदर्भातील माहिती आपल्या सोशल मीडियाच्या विविध हॅण्डलवरून पोस्ट करत असतात. तसेच प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या प्रवक्त्या देखील आहेत. त्यामुळे त्या सातत्याने आपली भूमिका ट्विटर, इन्स्टाग्राम,फेसबूक यावर अपडेट करत असतात. सोशल मीडियावर प्रणिती शिंदे यांचे फॉलोअर्सदेखील मोठ्या संख्येने आहेत.
प्रणिती शिंदे या जितक्या मनमिळावू, ग्लॅमरस राजकारणी आहेत, तितक्याच त्या आक्रमक राजकारणी म्हणून देखील ओळखल्या जातात. काँग्रेस विचारसरणी आणि गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या प्रणिती शिंदे यांनी कित्येकवेळा बेधडक वक्तव्ये करून आपली मते मांडली आहेत. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एमआयएमचे ओवैसी, राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यावर टीका करण्यासह त्या त्या वेळी त्यांनी प्रसंगानुरूप राजकीय वक्तव्ये केली आहेत.
यामध्ये कोरोनाकाळात झालेल्या नागरिकांच्या मृत्यू प्रकरणावरून टीका करताना प्रणिती शिंदे यांनी ताटं वाजवल्यामुळे देशात अवदसा आली, अशी टीका केली होती. त्यावरून प्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली होती. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच मोदी हे माध्यमांसमोर यायला घाबरतात, ते फक्त मतदानाच्या वेळीच जनतेसमोर येत असल्याचा टोलाही त्यांनी 2021 मध्ये पंतप्रधान मोदींना लगावला होता. तर 2018 मध्ये तत्कालीन भाजप खासदार शरद बनसोडे यांच्यावर बेवडा म्हणून टीका केली होती. याच बरोबर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर मतदारसंघावर दावा केला होता. त्यावेळी बोलताना कोण रोहित पवार? असा सवाल करत रोहित पवारांची हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत, त्यामुळे काही जणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवसानंतर त्यांच्यात मॅच्युरिटी येईल, असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावला होता.
याचबरोबर भाजप आणि राज्य सरकारने सहा कंत्राटदारांना महाराष्ट्र विकला असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावरूनही राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रणिती शिंदे यांनी ओवैसी यांच्या एमआयएम दहशतवादी पक्ष असल्याचा आरोप करत पक्षावर बंदी घालण्याची मागणी देखील केली होती. त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यावेळी ओवैसी यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात अब्रूनुकसानीची खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता.
सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)
प्रणिती शिंदे यांचे वक्तृत्व प्रभावी असून इंग्लिश, हिंदी, आणि मराठी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे लोकसभेत सोलापूरचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मनमिळावू स्वभाव, जनतेत मिसळून काम करणे, कष्टकरी, पीडित, शोषिंतांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. जाई जुई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांची सर्वसामान्य जनेतेशी जुळलेली नाळ कायम आहे. त्यामुळे त्यांचे नेटवर्क चांगले विस्तारले आहे. या शिवाय त्या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे या नावाचे वलय देखील त्यांच्यासाठी एक प्लस पाँइट आहे.
या शिवाय प्रणिती शिंदे या पक्षीय कामकाजात सक्रिय असून काँग्रेस वर्किंग कमिटीमध्येही त्या सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच स्पष्टवक्त्या आणि आक्रमक भूमिका मांडण्याच्या त्यांच्या स्वभामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये त्यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याबद्दल सध्या सोलापूरकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाजपकडून प्रत्येकवेळी आयात आणि जनसंपर्कात नसलेला उमेदवार सोलापूरकरांच्या माथी मारला जातो आहे. मात्र, त्या लोकप्रतिनिधीकडून विकासाची कामे होत नसल्याने मतदार भाजपवरच नाराज असल्याचे चित्र दिसत आहे, मतदारांची ही नाराजी प्रणिती शिंदे यांना लोकसभेसाठी एक पथ्यावर पडणारी सकारात्मक बाजू मानली जात आहे.
प्रणिती शिंदे या आजपर्यंत राज्याच्या राजकारणात काम करत असताना त्या स्वत:च्या मतदारसंघाचाच विचार करत आल्या आहेत. याशिवाय पक्ष विस्तारासाठी प्रणिती शिंदे यांचे फारसे योगदान दिसून येत नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण भागात विस्तारलेला आहे. मात्र प्रणिती शिंदे यांचा ग्रामीण भागातील जनसंपर्क कमी आहे. याशिवाय लोकसभेला सहा महिने उरलेले असताना आता त्यांनी मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत. पण त्याची तीव्रता ज्या प्रमाणात पाहिजे तेवढी दिसून येत नाही. तसेच पक्षांतर्गत झालेल्या फाटाफुटीला प्रणिती शिंदेंचा आक्रमकपणा कारणीभूत मानला जातो. त्यांच्याकडे बेरजेच्या राजकारणाचा अभाव दिसून येतो. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध असणे गरजे आहे. ही उणीव प्रणिती शिंदे यांच्याकडे दिसून येते.
सोलापूर लोकसभा हा मतदारसंघ सर्वाधिककाळ काँग्रेसकडे होता. मागील दोन टर्म या ठिकाणी भाजपने यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघाचे यापूर्वी नेतृत्व केले होते. तसेच सध्यस्थितीत काँग्रेसमध्ये भाजपच्या उमेदवारास तोंड देईल असा तुल्यबळ उमेदवार नाही. त्यातच सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित मानले जात आहे. तरीही काही राजकीय कारणांमुळे जर प्रणिती शिंदे यांना उमेदवारी न मिळाल्यास या मतदारसंघात काँग्रेसकडून पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेंनाच मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. सहा महिन्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. याशिवाय प्रणिती यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या पुन्हा विधानसभेच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार होण्यासाठी निवडणुकीला सामोऱ्या जाऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.