
Solapur, 15 December : सलग दोन वेळा पाच आमदार निवडून देऊनही सोलापूरला (Solapur) भारतीय जनता पक्षाकडून मंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. जिल्ह्यातील पाचपैकी एकाही आमदाराला अद्याप मंत्रिपदासाठी फोन आला नसल्याची माहिती आहे, त्यामुळे गेल्या पाच वर्षांप्रमाणेच सोलापूरला स्थानिक पालकमंत्री मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे २०१९ पासून सोलापूरला पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. विशेष म्हणजे एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाभलेल्या सोलापूरला आता मंत्रिपदासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून एकट्या महायुतीचे (Mahayuti) पाच आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये माजी मंत्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे आणि समाधान आवताडे यांचा समावेश आहे. गेल्या वेळीही सोलापूरकरांनी पाच आमदार निवडून दिले होते. या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती करत पाच आमदारांचे दान महायुतीच्या झोळीत टाकले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपुरात विस्तार होणार आहे. भाजपला २०, शिवसेनेला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा मंत्रिपदे मिळणार आहेत. भाजप नेत्यांकडून यादीतील आमदारांना फोन केले जात आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील पक्षाच्या पाचपैकी एकाही आमदाराला अद्यापपर्यंत फोन आलेला नव्हता. म्हणजेच मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूरला पुन्हा एकदा डावलण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
खरं तर भाजपकडून माजी मंत्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी हे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यातही कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आमदार मानले जात होते, त्यामुळे सचिन कल्याणशेट्टी यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, असे वातावरण होते. मात्र, दुपारी साडेबारापर्यंत तरी कल्याणशेट्टी यांना भाजपश्रेष्ठींकडून फोन आलेला नाही.
विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत सोलापूरला स्थानिक पालकमंत्री मिळू शकलेला नाही. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या काळातही परजिल्ह्यातील मंत्र्यांकडेच सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपकडून सोलापूरला मंत्रिपद दिले जाईल, असा राजकीय वर्तुळात सुरू होता. मात्र, भाजपकडून सोलापूरला मंत्रिपदासाठी पुन्हा एकदा हुलकावणी देण्यात आली आहे.
सोलापूरला २०१४ पर्यंत पहिल्या विस्तारात मंत्रिपदाची संधी मिळायची. राज्याच्या मंत्रिमंडळात सोलापूरमधून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सुशीलकुमार शिंदे, लक्ष्मण ढोबळे, दिलीप सोपल यापैकी एक नाव पहिल्याच यादीत असायचे. भाजपनेही २०१४ मध्ये पहिल्याच टप्प्यात विजयकुमार देशमुखांना राज्यमंत्री केले होते. मात्र, मागील २०१९ पासून पहिल्या विस्तारात सोलापूरला संधी देण्याची प्रथा मोडीत निघाली आहे.
विशेष म्हणजे २००३-२००४ दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद सोलापूरकडे होते. सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री, तर विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री होते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून मंत्रिपदासाठी सोलापूरला वेटिंगवर ठेवले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.