
Solapur, 13 June : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीला पुन्हा अनुपस्थिती दर्शवली. पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली असताना आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्याची मात्र बालाजी सरोवरमध्ये जाऊन आवर्जून भेट घेतली. देशमुख यांच्याप्रमाणेच माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले, त्यामुळे दोन्ही देशमुखांची नाराजी नेमकी पालकमंत्री गोरे यांच्यावर आहे की पक्षावर असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) आणि विजयकुमार देशमुख हे नाराज झाले आहेत. तेव्हापासून त्यांनी पक्षीय कार्यक्रमांकडे आणि भाजपच्या मंत्र्यांकडेही पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मत्स्ये व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे भाजपचे प्रमुख नेते गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आले होते. या मंत्र्यांच्या कार्यक्रमांकडे दोन्ही देशमुखांनी साध ढुंकूनही पाहिले नाही. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना तर पत्रकार परिषदेतच त्यावर खुलासा करावा लागला होता.
बावनकुळे, चंद्रकांतदादा यांनी सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही देशमुखांची नाराजी कायम राहिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशमुखांची नाराजी भाजपला कुठे घेऊन जाणार, असा प्रश्न आता खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच चर्चेला जात आहे.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते, या दौऱ्यात त्यांनी प्रशासकीय बैठकीबरोबरच भाजपच्या कोअर कमिटीचीही बैठक घेतली. या बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर उपस्थित होत्या. मात्र, पक्षाचे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
गोरे यांच्या बैठकीकडे दोन्ही देशमुख गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीपासून पालकमंत्री गोरे उपस्थित असलेल्या एकाही कार्यक्रमाला दोन्ही देशमुख उपस्थित राहिलेले नाहीत. अपवाद फक्त सोलापूर-गोवा विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्याचा आहे, त्यामुळे दोन्ही देशमुखांचा राग हा पालकमंत्री गोरे यांच्यावरच असल्याची कुजबुज आता सोलापुरात सुरू आहे.
भाजपच्या आणि पालकमंत्र्यांच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन्ही देशमुखांनी सोलापूर-गोवा विमा सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मात्र आवर्जून हजेरी लावली होती. पण, मुख्यमंत्री येणार नाहीत, हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी तेथूनही निघून जाणे पसंत केले होते, त्यामुळे भाजपचे सोलापुरातील वरिष्ठ नेते आपल्याच मंत्र्यांच्या कामावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.