

Karad, 15 October : सरकारच्या दबावापुढे झुकून साखर कारखाने सुरू करायचे असतील तर आम्हाला पहिल्यांदा गव्हाणीत टाका. पहिल्यांदा गव्हाणीत आमचे रक्त जाईल त्यानंतर तुमचा ऊस जाईल. जोपर्यंत ऊसदर जाहीर होऊन साखरेचा किमान हमीभाव वाढत नाही, तोपर्यंत एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही. सरकारच्या दबावामुळे जर साखर कारखाने सुरू केले तर ते पुन्हा सत्याग्रह आंदोलन करून ते बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (गुरुवारी, ता. १५ ऑक्टोबर) दिला.
रेठरे बुद्रूक (ता. कराड जि. सातारा) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यावर आंदोलनासाठी शेट्टी आले होते. त्यावेळी पोलिसांनी शेट्टींसह कार्यकर्त्यांना गेटवरच थांबवून आत जाण्यास मज्जाव केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार व संचालक धोंडिराम जाधव, लिंबाजी पाटील, बाळासाहेब जगताप, अविनाश खरात, एम. के. कापूरकर हे कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर येऊन शेट्टी यांची त्यांनी भेट घेतली.
या वेळी शेट्टी यांनी राज्यातील दुष्काळी स्थितीचा बाऊ करून आणि उसाचा उतारा मिळत नसतानाही सरकारने साखर कारखाने सुरू करायला सांगितले आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांचे आणि कारखान्याचे नुकसान आहे, हे कारखानदारांना माहीत असतानाही सरकारच्या दबावामुळे साखर कारखानदारांनी कारखाने सुरू केले आहेत.
गेल्या सात वर्षात साखरेच्या किमान हमीभाव दारात वाढ करून घ्यायला कारखानदारांना जमलेले नाही. त्यामुळे ज्यावेळी आम्ही ऊसदर मागतो त्यावेळी साखरेचा दर पुढे करून जादा दर देऊ शकत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ऊसदराचे आंदोलन करून आम्ही उसाचा दर व साखरेचा किमान हमीभाव वाढवून घेतो, असेच सांगितले होते. मात्र कारखानदारांनी सरकारच्या दबावापुढे झुकून कारखाने सुरू केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, साखरेचा हमीभाव वाढला की हक्काने ऊस दर आम्हाला वाढवून घेता येईल, अशी आमची भूमिका होती. मात्र, कारखाने सुरू करण्यात आल्यामुळे आंदोलनाची तीव्रता कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जोपर्यंत साखरेचा किमान हमीभाव वाढत नाही आणि ऊसदर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक सुतार यांनी यासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष व संचालक यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. शेट्टी यांच्या भूमिकेसोबतच आम्ही आहोत असे सांगितले.
त्यानंतर शेट्टी यांनी जोपर्यंत ऊस दराचा आणि साखरेच्या किमान हमीभावाचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू होऊ ठेवू नका, असे सांगून जर पुन्हा सुरू केला तर पुन्हा कारखान्यावर येऊन कारखाना बंद पाडू आणि सत्याग्रह आंदोलन सुरू करू, असा इशाराही यावेळी कार्यकारी संचालक व संचालकांना दिला.
....अन् पोलिसांवरील भार हलका झाला
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची धास्ती घेऊन प्रशासनाने कृष्णा कारखाना परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला होता. कराडच्या पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील, इस्लामपूरचे पोलिस उपाधीक्षक अरुण पाटील, कराड तालुका पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र शेट्टी यांनी आंदोलन जास्त ताणले नाही, त्यामुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा भार हलका झाला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.