
Solapur, 24 August : काँग्रेस पक्षाचे नवे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम आज (ता. 24 आगस्ट) झाला. त्या कार्यक्रमात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना लढण्याचे बळ देतानाच काही स्थानिक नेत्यांना कानपिचक्याही दिल्या आहेत. ‘आपल्यावर आरोप का होतात, याचाही शोध आरोप होणाऱ्यांनी घेतला पाहिजे,’ असेही त्यांनी सुनावले. तसेच, ‘आम्ही फार सुखाने नांदलो; पण तुम्हाला मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत,’ असेही शिंदेनी सुनावले.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, शहराध्यक्ष चेतन नरोटे (Chetan Narote) रात्रंदिवस काम करतात. पण त्यांच्यावरही कधी कधी आरोप होतात. काम करणाऱ्या माणसांवर आरोप हे होणारच. पण, काम करणाऱ्यांनी आपल्यावर आरोप का होतात, याचाही शोध घेतला पाहिजे. मला खात्री आहे की, ते आरोप का होतात, याबाबत तेही सुधारतील.
मी अनेकदा दिल्ली-मुंबईत असतो. मला अनेक कार्यकर्त्यांचे फोन येतात. मी सर्वांचे फोन घेतो. फोन न घेणं किंवा कोणाकडे तरी फोन देणे हे मी कधीच करत नाही. आताच्या सर्व मंत्र्यांचे फोन हे त्यांच्या पीएकडे असतात. कुठे काय झाले, हे तुम्हाला काय कळणार आहे. अशा कार्यकर्त्याला लोक बाजूला काढतात. कुणाच्या टीकेला घाबरू नका. आपले काम करत राहा. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, असा विश्वासही सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी स्थानिक नेत्यांना दिला.
ते म्हणाले ‘काँग्रेस पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांना आता खूप काम करावं लागणार आहे. एखाद-दुसरा प्रसंग सोडला तर आम्ही खूप सुखाने नांदलेले लोक आहोत. पण, नव्या लोकांना अतिशय कष्टाने काम करावे लागणार आहे. मोठ्या कठीण परिस्थितीत तुम्ही मोठ्या उत्साहाने ते पद स्वीकारलेले आहे. तुम्हाला रात्रंदिवस काम करावं लागेल. तुम्हाला काँग्रेस वाढवावी लागेल.
नव्याने होणाऱ्या प्रभाग रचनेकडे सर्वांनी लक्ष ठेवले पाहिजे. अध्यक्ष सांगतात, त्यानुसार सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. कारण ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दिलेला आदेशच खाली सांगत असतात. त्यामुळे यात ढिलेपणा असता कामा नये. जिल्हाध्यक्ष, तुम्हाला दिलेली तलवार आणि चिलखत घेऊन लढावं लागणार आहे. मला खात्री आहे की, पुन्हा आपली काँग्रेस सत्तेवर येणार आहे, असा विश्वासही शिंदे यांनी बोलून दाखवला.
शिंदे म्हणाले, आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून नेहमी दक्ष राहिले पाहिजे. कोणी कोठेही गेले तरी आपण तत्वाने लढलो तर सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस उभी राहील. मध्यंतरीच्या काळात आपले काही सहकारी इकडे तिकडे पळाले. पण आता तेही होणार नाही. शेतकरीही कठीण परिस्थितीत उभा आहे. पण, केंद्र आणि राज्य सरकारमधील लोक हे बोलतात एक आणि करतात दुसरं, त्यामुळे शेतकरीही चिडलेला आहे.
कालपर्यंत जे झालं ते आता विसरा आणि आजपासून काँग्रेस पक्षाचा मी मालक आहे, या भूमिकेतून काम करा. आपले जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार हे दिसतात तगडे, ते काँग्रेस पक्षही तसाच उभे करतील. याबाबत माझ्या मनात शंका नाही, अशी भावनाही शिंदे यांनी बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.