Solapur News : ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाकडून आंदोलने, सभा घेतल्या जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही रणनीती ठरवली जात आहे. त्यानुसार एका मतदारसंघात एक ते दीड हजार उमेदवार उभे करण्याचा निर्णय सोलापूरमध्ये झालेल्या बैठकीत मराठा समाजाने घेतला. त्यामुळे आगामी निवडणुकीत यंत्रणा हाताळणे प्रशासनाला कटकटीचे ठरण्याची शक्यता आहे.
सकल मराठा समाजाच्या (Maratha community ) प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोलापुरात (Solapur) झाली. त्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण रणनीती ठरविण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक गावातून तीन ते चार उमेदवार उभे करावेत. तसेच, एका एका मतदारसंघात एक ते दीड हजार उमेदवार उभे करण्यात यावेत. तसेच, निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यासाठी सरकारला भाग पाडण्यात यावे, असे या बैठकीत ठरले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढविण्याचा खर्च लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. प्रत्येक वाहनावर आणि घरावर ‘मी मतदार-मी उमेदवार’चा फलक लावण्यात येणार आहे. जे मतदारसंघ राखीव आहेत, त्या ठिकाणी समाजाच्या पाठिंब्यावर उमेदवार उभा करण्यात येईल. पहिल्या दिवसांपासून अर्ज भरायला सुरुवात करायची, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. माढा, सोलापूर आणि धाराशिव मतदारसंघांतून उमेदवार उभे करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
मराठा समाजाला देण्यात आलेले दहा टक्के आरक्षण हे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये लागू होत नाही. तसेच, शैक्षणिक प्रवेश परीक्षांसाठीही त्याचा फायदा मराठा समाजाला होत नाही. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्क्यांमधूनच आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या बैठकीत पुन्हा करण्यात आली.
सदावर्तेंना भाजपचाच पाठिंबा
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना भाजपकडून तिकीट देण्याची चर्चा आहे. एकीकडे आरक्षण द्यायचे आणि सदावर्ते यांच्या माध्यमातून काढून घ्यायचे, असा खेळ भाजप करत आहे. ॲड. सदावर्ते यांना भाजपचाच पाठिंबा आहे, असा आरोप मराठा समाजाकडून पूर्वीपासून करण्यात येत आहे. सोलापुरातून सदावर्ते यांना तिकीट दिले तर मराठा समाजाचा कोणता नेता प्रचारासाठी सोलापुरात येतो तेच पाहू, असे चॅलेंज मराठा समन्वयक माऊली पवार यांनी दिले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.