
Solapur, 17 July : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना शाई (ऑईल) फासून धक्काबुक्की केल्याप्रकरणी अटकेतील शिवधर्म फाउंडेशनचा दीपक काटे आणि त्याचा साथीदार भवानेश्वर बबन शिरगिरे या दोघांना गुरुवारी (ता. 17 जुलै) अक्कलकोट न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्याचवेळी वकिलांच्या अर्जावरून संशयितांना जामीनही मंजूर केला. जामीन देताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत.
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या सत्कार समारंभासाठी प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) हे रविवारी (ता. 13 जुलै) अक्कलकोट येथे आले होते. या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. त्याचवेळी शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे आणि त्याच्या सहकऱ्यांनी गायकवाड यांच्यावर पहिल्यांदा शाई ओतली. त्यानंतर गायकवाड आपल्या गाडीत बसले. त्यानंतर त्यांना बाहेर काढून धक्काबुक्की केली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते.
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही त्यावर चर्चा झाली. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले होते. पोलिसांनी हल्लेखोरांवरील गुन्ह्यात कलम वाढविले आणि ताब्यात घेतलेल्या दोघांना अटक केली होती. त्यांची दोन दिवसांची कोठडी संपल्यावर पोलिसांनी त्यांना अक्कलकोट (Akkalkot) न्यायालयात हजर केले होते.
संशयित आरोपींचे कपडे, ऑईल डबा जप्त करण्यात आला असून उर्वरित तपास करण्यासाठी संशयितांना पाच दिवसांची वाढीव कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, संशयितांच्या वकिलांनी त्यास हरकत घेत अटकेतील दोघांकडील तपासही पूर्ण झाल्याचा युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने दोघांचा 20 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
एकूण दहा जणांवर गुन्हा
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्या तक्रारीवरून अक्कलकोट उत्तर पोलिसांनी पहिल्यांदा दीपक काटे याच्यासह किरण साळुंखे, भैय्या ढाणे, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबू बिहारी, भवानेश्वर बबन शिरगिरे या सात जणांवर गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या दिवशी रवींद्र उर्फ लल्या लेंगरे, अक्षय चव्हाण आणि अनिल माने या तिघांवर, अशा दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी दोघांनाच अटक करण्यात आली होती. उर्वरित आठ जणांच्या शोधासाठी तीन पथके रवाना होऊनही पोलिसांना ते सापडलेले नाहीत.
दोघांना दर शनिवारी अक्कलकोटची वारी
गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होईपर्यंत जामीनावर सोडलेल्या दोन संशयित आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर बबन शिरगिरे यांना दर शनिवारी अक्कलकोट उत्तर पोलिसांत हजेरी लावून ‘हजेरी रजिस्टर’ला स्वाक्षरी करण्याची अट न्यायालयाने घातली आहे.
उद्या अक्कलकोट बंद
प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाने उद्या (ता. १८ जुलै) अक्कलकोट बंदची हाक दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.