
Kolhapur, 08 September : फुटीनंतर दोन्ही शिवसेना एकमेकाला पाण्यात बघायची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा शिलेदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासोबत हॉटेलमध्ये एकत्र असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. कोल्हापूर उत्तरचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी चारच दिवसांपूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग रचनेचे स्वागत केले होते. त्यानंतर त्यांचे फोटो समाज माध्यमांत व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरात त्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.
राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चांगलाच दरार निर्माण झाला आहे. ठाकरेंची शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेवर तुटून पडते. आरोप प्रत्यारोपांचा खेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्येक वेळी आव्हान दिले जाते. पन्नास खोके, एकदम ओके, गद्दार सेना अशी उपमा ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेला दिली जाते.
माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यासोबत शहराध्यक्ष सुनील मोदी हे देखील शिवसेनेत सक्रिय होते. मात्र, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सुनील मोदी हे उद्धव ठाकरेंच्या सोबत, तर माजी खासदार संजय मंडलिक यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर राज्यपाल नियुक्तीच्या बारा आमदारांच्या प्रक्रियेत न्यायालयीन लढाईमध्ये सुनील मोदी हे अग्रेसर होते, त्यामुळेच ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी निकटवर्तीय बनले होते.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचा या प्रभाग रचनेला कडाडून विरोध आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी ही प्रभाग रचना योग्य आणि स्वागतार्ह असल्याचे म्हटले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते.
शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, भूषण पाटील यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी हे एका हॉटेलमध्ये बसले असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोने ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासोबतच्या फोटो संदर्भात शहराध्यक्ष सुनील मोदी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ‘माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव यांनी कोल्हापुरात हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी हा फोटो काढण्यात आला आहे’, असा खुलासा मोदी यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.