Solapur, 15 April : वंचित बहुजन आघाडीला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर आणि माढा लोकसभेचे उमेदवार आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी राजीनामा दिला आहे.
राजीनाम्याबाबत गायकवाड म्हणाले, बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्वतः राजीनामा द्यायला सांगितलं आहे. मी आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे, पक्षादेश स्वीकारून राजीनामा दिला आहे. काही लोकं आंबेडकरी चळवळ संपवायचं प्रयत्न करत आहेत, यापुढेदेखील मी आंबेडकर चळवळीचं काम करणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) माढ्यातून मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, सोलापूर लोकसभेसाठी अक्कलकोट येथील राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन्ही उमेदवार आज आपले अर्ज भरणार आहेत, तत्पूर्वीच सोलापुरात वंचित बहुजन आघाडीला धक्का बसला आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून राजीनामा द्या, असा निरोप आल्याने मी राजीनामा देत आहे, असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी राजीनामा देताना दिलं आहे. माझ्या कारकिर्दीत पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यात 2000 बूथ कमिट्या आणि 600 शाखा उभारल्या आहेत. मात्र, या कामाची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही दखल घेत गेली नाही, अशी खंतही गायकवाड यांनी व्यक्त केली.
हायकमांडचा आदेश असल्याने नाईलाजाने मला राजीनामा द्यावा लागत आहे. आंबेडकरी चळवळीतला मी एकमेव गद्दार नसणारा माणूस आहे, त्यामुळे मला अशी वागणूक मिळत आहे. पण, मी आंबेडकरी चळवळीत शेवटपर्यंत राहणार आहे. निळा झेंडा मी कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असेही श्रीशैल गायकवाड यांनी सांगितले.
यापुढे वंचित बहुजन आघाडीचं नव्हे; तर आता आंबेडकरी चळवळीचं काम करणार आहे. मला बाळासाहेबांसोबत चर्चा करण्याची संधीच दिली गेली नाही, अशी तक्रारही गायकवाड यांनी नाेंदविली. वंचित बहुजन आघाडीच्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे की, काम करूनही दखल घेतली जात नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना जिल्हा कमिटीला वरिष्ठांनी विश्वासात घेतलं नाही. आंबेडकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता अशा राजकारणामुळे धोक्यात आला आहे, असेही श्रीशैल गायकवाड यांनी म्हटले आहे.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.