Solapur, 19 April : पुतण्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघासोबत ते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या पुन्हा गाठीभेटी घेत आहेत. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यानंतर विजयदादांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षासोबत असलेले संबंध तोडले आहेत. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP) प्रवेश करून माढ्यात लोकसभेचा (Madha Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज भरला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवावी, यासाठी त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विजयदादांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (sushilkumar Shinde) यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्या भेटीनंतर विजयसिंह मोहिते पाटील (Vijayshinh Mohite Patil) यांनी पुतण्या धैर्यशील यांच्यासोबत लोकसभेचा पूरक उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर विजयदादा माढ्याबरोबरच सोलापूर लोकसभा मतदारसंघातही सक्रिय झाले आहेत. त्यातूनच ते गाठीभेटींच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय हेाताना दिसत आहेत.
माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील हे गुरुवारी बार्शी तालुक्यातील वैराग येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांनी बार्शी माजी मंत्री दिलीप सोपल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्या ठिकाणी त्यांनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला. दिलीप सोपल आणि विजयदादा यांचा भरभराटीचा काळ एकच होता. विजयदादा हे सोलापूरच्या राजकारणावर पकड ठेवून हेाते, त्यावेळी सोपल हे त्यांचे पाठीराखे हेाते. पुढे सोपल हे पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रीही झाले.
बार्शीच्या सोपल यांच्यानंतर मोहिते पाटील यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचीही अनगर येथील वाड्यावर जाऊन भेट घेतली. खरं तर माजी आमदार पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, तर विजयदादा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेले आहेत, त्यामुळे राजन पाटील यांच्या भेटीवर राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. या भेटीमुळे सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या पोटात गोळा आले, अशी टिपण्णी राजकीय क्षेत्रातून केली जात आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.