

Nagar Political News : राज्यात महायुतीचे सरकार असले तरी अजितदादांचे नगर जिल्ह्यात पारनेरमधील अगदी जवळचे मानले जाणारे आमदार नीलेश लंके आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्यातील तू तू-मै मै सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज (16 ऑक्टोबर) लंकेंच्या मतदारसंघात येत असून, त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ होत आहे. त्यामुळे अजितदादा जिल्ह्यातील लंके-विखे वादावर काही भाष्य करतात का? याकडे अवघ्या नगर जिल्ह्याचे लक्ष आहे.
उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आपल्या कामाच्या धडाकेबाज शैलीबरोबरच सडेतोड बोलण्यासाठी एक वेगळी ओळख ठेवून आहेत. राष्ट्रवादीतील फुटीअगोदर पक्षाच्या एका कार्यक्रमात अजितदादांनी लंकेंच्या कामाचा आणि लंके-विखे यांच्यातील सातत्यपूर्ण राजकीय टीकाटिप्पणीच्या पार्श्वभूमीवर बोलताना " नीलेश लंके तर तिकडे लंकाच पेटवत चालला" असे वक्तव्य केले होते. अजितदादांचे हे वक्तव्य विखे पिता-पुत्रांसाठीच होते हे उघड गुपित आहे.
अजित पवारांनी नीलेश लंके यांना नेहमीच साथ दिली आहे. लंकेंच्या शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देण्यापासून तर 2019 मध्ये त्यांना पारनेरमधून उमेदवारी दिली. नंतर त्यांच्या विजयासाठी अनेक सभा घेतल्या. पुढे राज्यात ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी मोकळ्या हाताने लंकेंना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. नुकत्याच राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यामुळेच विकासकामांच्या निधीचे कारण पुढे करत आ. लंके यांनी मनाला मुरड घालून शरद पवार-सुप्रिया सुळेंची साथ सोडली. एकंदरीत लंके हे अजितदादांचे नेहमीच लाडके राहिले असून, आज विकासकामांच्या शुभारंभासाठी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर लष्कराच्या केके रेंज सराव क्षेत्राच्या शेकडो एकर जागेचा विषय असो, महिला-पुरुषांना देवदर्शनाचा विषय असो, की पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या श्रेयवादाचा विषय असो, लंके यांनी नेहमीच खा. सुजय विखे यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करत निशाणा साधला आहे. लंकेंनी दोन वर्षांपूर्वीच नगर दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी ही राष्ट्रवादी पक्षाकडून केली आहे, तर सध्याच्या बदललेल्या राजकीय गणितात महायुतीत सुजय विखे विद्यमान खासदार आहेत.
त्यामुळे महायुतीचा धर्म म्हणून आपल्या उमेदवारीवरील हक्क सोडून केलेल्या तयारीवर पाणी सोडतील, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, नीलेश लंकेंनी विखेंवर केलेले तिखट वार पाहता त्यांनी अजून आपला उमेदवारीचा हक्क सोडला नसून तो हक्क अजून मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत.
एकंदरीत या सर्व अनुषंगाने अजित पवार आपल्या लाडक्या आमदार नीलेश लंकेंच्या मतदारसंघांत येत असल्याने आपल्या भाषणात या विषयाला हात घालणार का? माध्यमांनी त्यांना या विषयावर छेडल्यावर आपल्या रोखठोक शैलीत काय प्रतिक्रिया देणार का? याला जुन्या विखे-पवार संघर्षाची झलक त्यातून दिसणार का? अशा अनेक गोष्टींमुळे अजितदादा लंकेच्या राजकीय भूमीतून काही 'दादागिरी' करणार का याबद्दल जिल्ह्यात मोठी उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.