Solapur Dcc Bank : मोहिते पाटलांनी रणशिंग फुंकले : कोल्हापूर, लातूरमध्ये शिट्टी जोरात वाजलीय; आता सोलापुरातही जोरात वाजवा...

Dhairyasheel Mohite Patil : सोलापूर डीसीसी बँक निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी पॅनेल मैदानात आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिट्टी चिन्हासाठी जोरदार पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 21 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकरी बॅंकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी पॅनेल उभं आहे. या निवडणुकीत शिट्टी हे आपलं चिन्ह आहे, त्यामुळे आपल्याला शिट्टी जोरात वाजवायची आहे. यापूर्वी कोल्हापूर आणि लातूरमध्ये शिट्टी जोरात वाजली आहे. तशी साथ तुम्ही इथं शिट्टी वाजवून द्यावी, असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी करत जिल्हा बॅंकेची निवडणूक गांभीर्याने लढण्याचे संकेत दिले.

माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून विरोधक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लढवत आहेत. त्याच्या प्रचाराच्या सभेत बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंचा समाचार घेत मतदारांना शिट्टी वाजविण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकरी बॅंकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभं केलं आहे. सर्वजण बोलतात, रणजितदादाही बॅकिंगबाबत बोलतात. मी फक्त एका मुद्यावर बोलायला उभा आहे.

समोरच्या पॅनेलच्या प्रचाराचा परवा सोलापुरात शुभारंभ झाला. एका माणसाला (पालकमंत्री जयकुमार गोरे यांना उद्देशून) आपल्या जिल्ह्यात कुठंलही इलेक्शन आलं की, सगळ्यांना भीती दाखवायची सवय आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल. तुम्हाला निधी पाहिजे असेल तर आम्हाला मतं टाका, अशी धमकी दिली गेली, असा आरोप मोहिते पाटील यांनी केला.

ते म्हणाले, वसंतराव देशमुख विधान परिषद निवडणुकीला उभे होते, त्या निवडणुकीवेळीही ‘तुम्हाला पुढची विकासकामं करायची आहेत की नाही. असं धमकावलं जायचं. त्यात आणखी एक मुद्दा त्यांनी टाकला असून तुम्ही दहा जणांनी मिळूनच मतदानाला जायचं. इतर लोकांनी जायचं नाही. संपूर्ण वॉच ठेवला गेला आहे.

Dhairyasheel Mohite Patil
Pune News : पुण्यातून भाजपला धक्का! 6 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार असलेल्या कुटुंबातील व्यक्ती काँग्रेसमध्ये दाखल

सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात आजतागायत नेतेमंडळींना बूथवर उभं राहिलेलं आम्ही कधीही बघितलं नाही. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार लोकंही बूथवर उभे होते आणि गैरविश्वास दाखवून मतदान करून घेत होते. त्या निवडणुकीत आमच्याकडे ६ मतं तरी आहेत का, असं म्हणत महाविकास आघाडीला खिजवलं जात हेातं. पण, वसंतराव देशमुख हे त्या निवडणुकीत ११८ पर्यंत पोचले होते, अशी आठवणही धैर्यशील मोहिते पाटील यांनी करून दिली.

ते म्हणाले, आताही विधान परिषद निवडणुकीतील आवृती जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सुरू झाली आहे. आपले उमेदवार वकिलसाहेब बोलले की, सहकार कायद्याप्रमाणे कोणाचंही मतं इतर कोणालाही कळत नाही. पण परवा समोरच्या पॅनेलच्या प्रचारसभेत भीती दाखवली गेली की तुमचं मतदान कळणार आहे आणि तालुकावार कळणार आहे. पण तालुकावर मतदान कळायची सहकार कायद्यात तरतूदच नाही.

Dhairyasheel Mohite Patil
Satara News : शिवसेना-राष्ट्रवादीच्या जिल्हा बँकेतील खेळीचा भाजप वचपा काढणार? झेडपी, पंचायत समितीतील ‘स्वीकृत’ निवड रडारवर

मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपल्या पॅनेलच्या वतीने एक अर्ज दिला आहे. जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांचं मतदान एकत्र झालं पाहिजे आणि त्यानंतरच ते मोजलं गेलं पाहिजे. त्यामुळे मतमोजणी कायद्याप्रमाणेच होणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, भ्यायचं काही कारण नाही. तुमच्या सद्‌सदविवेक बुद्धीला जे पटतंय, त्याच पद्धतीने मतदान करा आणि आपल्या जिल्ह्यात पुरोगामी विचार टिकवायचा असेल तर स्वाभिमानी शेतकरी पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन मोहिते पाटील यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.