

Mumbai : मागील वर्षी जून महिन्यात राज्यात सत्तेत आलेल्या भाजपा आणि शिंदे गटात काही दिवसांपासून काही ना काही कारणावरून वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. आधी ठाण्यातील वादानंतर भिडलेले भाजपा-शिंदे गटाचे नेते नंतर एकनाथ शिंदे यांना सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीवरून आमने सामने आलेले पाहायला मिळाले होते.
यानंतर राष्ट्रवादीला सत्तेत सोबत घेत मंत्रिपदाची शपथही दिल्यामुळेही शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. याचवेळी भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी शिंदे सरकारमध्ये फडणवीसच हायकमांड असल्याचं विधान केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
सातारा येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.१५) भाजपाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. तसेच या बैठकीला भाजपा आमदार जयकुमार गोरे(Jaykumar Gore) आणि पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे म्हणाले, राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत आणि आपल्या नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला कधी बरोबर घ्यायचं आणि कधी सोडायचं? असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
गोरे नेमकं काय म्हणाले...?
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, भाजपाने घेतलेला निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. आपलं नेतृत्व खूप सक्षम आहे. त्या नेतृत्वाला माहिती आहे की कोणाला आपल्याबरोबर घ्यायचं, कोणाला सोडायचं, कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं आणि कोणाला कधी सोडायचं? आपल्या राज्य सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)च आहेत.
आमदार गोरे यांना शिंदे गटाचं प्रत्युत्तर....
शिंदे गटाचे प्रवक्ते व आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी आमदार जयकुमार यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले, राज्य सरकारचे हायकमांड हे एकनाथ शिंदे आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारां(Ajit Pawar)चे हायकमांड शिंदेच आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्यांचे समर्थक किंवा सहकारी आहेत. परंतू सूत्र मुख्यमंत्र्यांच्या हातात असणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच सर्वांचे हायकमांड आणि सरकारमधले प्रमुख आहेत असल्याचं रोखठोक मत शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे.
मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले..?
शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे याचा हायकमांड वक्तव्यावरून चांगलेच कान टोचले. देसाई म्हणाले, मलाही तसं बोलता येतं. कोण हायकमांड आहे ते. पण असं वक्तव्य करून कुणाला तरी कमी लेखणे हे योग्य नाही. शिंदे आणि फडणवीस यांची राम-लक्ष्मणाची जोडी आहे. ही जोडी तुटणार नाही असा विश्वासही देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच जयकुमार यांना मी माझ्यापेक्षा निधीचा जास्त वाटा देऊन, झुकतं माप देऊन काम केलं आहे असंही ते म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.