
Solapur, 31 July : शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आज (ता. 31 जुलै) आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या निर्णयप्रक्रियेतून डावलले जात असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात सावंतांनी बोलून दाखवली आहे. तशाच हालचाली शिवसेनेत घडल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भावाला मंत्रिपदाचा शब्द मिळत असताना आपल्याला डावलले जात आहे, अशी धारणा झाल्यानेच सावांतांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिंदेंनी तानाजी सावंतांची घेतलेली भेट आणि त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांनी शिवाजी सावंतांनी दिलेला राजीनामा हा योगायोग आहे की आणखी काही, असा सवाल उपस्थित होत आहे.
शिवाजी सावंत (Shivaji Sawnt) हे सावंत कुटुंबाच्या राजकारणाचे फाउंडर मेंबर मानले जातात. शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे सावंत यांनी जिल्हा परिषद सदस्य, विरोधी पक्षनेत्यापर्यंत मजल मारली. पण, त्यापुढे त्यांची गाडी जाऊ शकलेली नाही. शिवसेनेतील फुटीनंतर तानाजी सावंत यांच्याप्रमाणेच शिवाजी सावंत यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले.
एकनाथ शिंदे यांनीही शिवाजी सावंत यांच्यावर सोलापूर (Solapur) जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. काही महिन्यांपर्यंत सावंत यांचे काम पक्षात सुरळीतपणे सुरू हेाते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय कोकाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर माढा तालुक्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि शहराध्यक्षांच्या नियुकत्यांमध्येही सावंत यांना डावलले गेल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. सावंत यांनी सूचविलेल्या नावाऐवजी इतरच नावे पुढे आल्याने त्यांच्या नाराजीचा स्फोट झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, शिवाजी सावंत यांनी दोन महिन्यांपूर्वी मोठा गाजावजा करून माढ्यात एक कार्यक्रम आयोजित केला हेाता, त्याला एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केले होते. मात्र, शिंदेंनी अचानकपणे येण्याचे टाळून उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर नेत्यांना कार्यक्रमासाठी पाठवले होते. त्यामुळे शिवाजी सावंत यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज झाले होते. शिंदेंनी कोणाच्या सांगण्यावरून शिवाजी सावंतांच्या कार्यक्रमाला येण्याची टाळले, असा सवाल आज विचारला जात आहे.
संजय कोकाटे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सावतांच्या समर्थकांकडून केला जात आहे. खुद्द शिवाजी सावंतांनीही एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात खच्चीकरण होत असल्याचा दावा अडवळणाने केला आहे. तसेच, स्वतःच्या माढा तालुक्यातही शिवसेनेचे पदाधिकारी नेमताना आपल्याला विचारले जात नसल्याची भावना शिवाजी सावंतांच्या मनात आहे, त्यातून त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
ती भेट आणि राजीनामा
सावंत कुटुंबात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून कलह असल्याची चर्चा आहे. कुटुंबातील अनेकांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षात आपला सवतासुभा मांडल्याचे दिसून येत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांची पुण्यात घरी जाऊन भेट घेतली. त्या भेटीत तानाजी सावंतांना शिंदेंनी मंत्रिपदाचा शब्द दिल्याची चर्चा आहे. एकीकडे भावाला मंत्रिपदाचा शब्द मिळत असताना आपल्याला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतही विचारात घेतले जात नाही, अशी भावना शिवाजी सावंत यांच्या मनात बळावत गेली आणि त्यातून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
शिंदेंशी जवळीक वाढली
शिवाजी सावंत यांचे माजी आमदार बबनराव शिंदे आणि संजयमामा शिंदे यांच्याशी विधानसभा निवडणुकीपासून जवळीक वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत माढ्यात शिवाजी सावंत यांनी बबनदादांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला हेाता. त्यामुळे माढ्यात शिंदे आणि सावंत यांच्यात पुन्हा समझोता एक्स्प्रेस धावणार का, असा सवाल तालुक्यातून विचारला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.