

Solapur, 02 June : काँग्रेसचे सोलापुरातील विधान परिषदेचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर छाननीत आक्षेप घेण्यात आला आहे. पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी सूचक म्हणून आपण सही केली नाही, ती बनावट आहे, असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. मात्र फत्तेपूरकर यांनी भाजप आणि भोसले यांच्यावर विश्वासघाताचा, तसेच ते भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, फत्तेपूरकर आणि नागेश भोसले यांच्यात झालेल्या संवादामध्ये माझ्यावर दबाव आल्याचे भोसले यांनी सांगितले आहे. तुम्ही असं का केलं?, तुम्ही कशाला अनुमोदक म्हणून सही केलीत? अशी विचारणा करणारे मला तिघांचे फोन आले होते, असे भोसलेंनी म्हटल्याचे स्पष्टपणे ऐकू येते. (सरकारनामा या ऑडिओची पुष्टी करत नाही)
याबाबत काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर म्हणाले, माझ्या उमेदवारी अर्जावर सही केली नाही, असे प्रतिज्ञापत्र पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी दिले आहे. भोसले यांनी स्वतः फोन करून मला सूचक म्हणून सही दिलेली आहे आणि आता त्यांनी मी सहीच केली नाही, असे प्रतिज्ञापत्र दिले आहे.
मला सही दिली नाही, असे नागेश भोसले यांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे. मी माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की, त्यांनी मला सूचक म्हणून सही दिली आहे. आम्ही दोघंही पांडुरंगाच्या दारात उभं राहू आणि विठ्ठलाच्या मूर्तीला हात लावून मला सही दिली नसल्याचे सांगावे, असे आव्हान काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांनी नागेश भोसले यांना दिले आहे.
फत्तेपूरकर म्हणाले, असल्या गोष्टी करायच्या असतील तर आम्ही मरेपर्यंत त्यांच्याशी संबंध ठेवणार नाही. नागेश भोसले यांनी माझा विश्वासघात केला आहे, केसाने गळा कापला आहे. मी त्यांना कधीही माफ करणार नाही. मी आणि नागेश भोसले हे ३० वर्षे एकत्र आहोत. मी आणि ते २००६ मध्ये एकत्र नगरसेवक म्हणून निवडून आलो आहोत, तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. त्या अगोदर आम्ही दोघं गाडीविक्रीचा व्यवसाय एकत्रित करत होतो. पण ते असे वागले असतील तर माझ्यासाठी दुदैव आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत लोकशाहीची हत्या झाली आहे. हे दबावापोटी झालेले राजकारण आहे. त्यांच्या फोनवर बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, तीन लोकांचा माझ्यावर दबाव आहे. मी त्यावर त्यांना बाहेरगावी जाण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर त्यांनी आज प्रतिज्ञापत्र दिले आहे, असे फत्तेपूरकर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.