

Solapur, 27 Septmber : स्वतःच्या माण तालुक्यात जलनायक म्हणून फिरतात आणि ३४ गावांत ३५० टॅंकरद्वारे पाणी पुरवठा त्यांच्याच तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे ते काय आपलं पालकत्व स्वीकारणार? आपली दशा काय होणार आणि काय वाट लागणार, याची काळजी आहे. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, सोलापूरला चांगला आणि शेतीची जाण असलेला पालकमंत्री द्या. तो सोलापूरला वेळ देईल, लोकांची चेष्टा न करता त्यांचं म्हणणं समजून घेईल, अशा शब्दांत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंंत्री जयकुमार गोरे यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले, खासदार लोकांची काय भीती आहे, माहिती नाही. आमचं जाऊ द्या. त्या ओमराजे निंबाळकर यांना तरी परवा मिटिंगला बोलावायचं होतं. फक्त आमदारांना बैठकीला बोलावण्यात आलं होतं. मला आणि प्रणिती शिंदे यांना बैठकीला बोलावलंच नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करणार आहे.
आम्हाला बैठकांना बोलावलं जात नाही. संसदेचं अधिवेशन सुरू असताना बैठका घेतल्या जातात. सोलापूर जिल्ह्यात ती नवीन फॅशन सुरू झाली आहे. पण, सगळ्यांना विश्वासात घेऊन बैठका घ्या. आम्ही तर म्हणतोय ग्रामपंचायत सदस्यापासून सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. टीमवर्क केलं तरच आपण या दुष्काळाला तोंड देऊ शकतो; अन्यथा परिस्थिती गंभीर आहे, असेही मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचा सहा जिल्हे आणि ३१ तालुक्यांना फायदा होणार होता. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, बीड आणि धाराशिव या जिल्ह्याचा त्या समावेश होता. आता या योजनेला नवीन नाव दिलं आहे. त्या योजनेत किती पाणी येणा, हे माहिती नाही. पण नव्या योजनेत फक्त ६० टीएमसी आपल्याला मिळणार आहे. पूर्वी कृष्णेचे ११७ टीएमसी पाणी मिळणार होते. पण ६० टीएमसी पाण्याचे स्वप्न दाखवलं जातं आहे.
एक थेंबही खाली जाऊ देणार नाही
आम्हाला आमच्या हक्काचं पाणी दिलं पाहिजे. आमचा दुष्काळी जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावांत सिंचनाची सुविधा नाही, ती गावे या योजनेत समाविष्ठ केल्याशिवाय आम्ही एक थेंबही खाली जाऊ देणार नाही, असा इशाराही मोहिते पाटील यांनी दिला.
चंद्रभागा स्वच्छतेसाठी निधी द्या
नमामी गंगेप्रमाणे चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यासाठी निधीची तरतूद केली पाहिजे. त्यातून चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.