
Satara, 22 March : फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासक नियुक्तीच्या निमित्ताने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच तिजोरी लुटली. श्रीमंत म्हणून ज्यांच्या ताब्यात कारखाना दिला, त्यांनी शोषून त्यात दमडीही ठेवली नाही. तुमचे पराक्रम फलटणमधील सर्वसामान्यांना माहिती आहेत. तुम्ही श्रीराम कारखाना भाड्यानं दिला तो दिला. पण, फलटणच्या हक्काचं पाणीसुद्धा तुम्ही 30 वर्षे भाड्यानं दिलं होतं. ते रणजितसिंह निंबाळकरांनी ताकदीने परत मिळविले, असा हल्लाबोल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता रामराजेंवर केला.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला (Shriram Sugar Factory Election) स्थगिती देऊन राज्य सरकारने कारखान्यावर प्रशासक नेमला आहे. त्या पार्श्वभूमीवर निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रामराजे गटावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, फलटणचा श्रीराम सहकारी साखर कारखाना मागील पंधरा वर्षे भाडेतत्वावर चालविण्यासाठी आवाडेंना देण्यात आला होता. भाडं वाढविण्याऐवजी भाडं कमी होणारा कारखाना, जमिनी घेण्याऐवजी जमिनी विकणारा कारखाना, कर्जमुक्त कारखाना म्हणून सांगतात, पण कारखान्यावर 115 कोटी रुपये कर्ज असल्याचं सांगितलं जात आहे. अशा भ्रष्टाचारावर त्यांनी बोलणं योग्य होईल.
आवाडेंच्या घशात काय घातलं आहे, याचीही त्यांनी माहिती घ्यावी. आवाडेंच्या जीवावर त्यांना कारखाना चालवायचा असेल तर त्याबाबत मला काही बोलायचं नाही. पण दुर्दैव आमचं आहे की, ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच तिजोरी लुटली, अशी फलटण तालुक्याची परिस्थिती आहे. इथले लोकप्रतिनिधी श्रीमंत म्हणून त्यांच्या ताब्यात कारखाना दिला, त्या कारखान्याला शोषून आज दमडीही ठेवली नाही. पुढे हा कारखाना अवसायनात काढावा लागेल, अशी परिस्थिती त्यांनी आणून ठेवली आहे. चार हजार सभासंदाचे हक्क डावलण्यात आले आहेत. कारखान्यावर प्रशासक नेमून त्यांना त्यांचे हक्क द्यावे लागतात, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी स्पष्ट केले.
शिक्षणावर आधारित तुमचा पराक्रम असता तर मागच्या तीस वर्षांत फलटणाला बारामतीच्या पुढे नाही, तर बारामतीच्या बरोबर घेऊन गेला असता. तरीही तुमच्या शिक्षणाचं महत्व आहे, असे आम्ही म्हटलं असतं. वीस वर्षांपूर्वीचं फलटण, एकेकाळी एक लाख लिटरचं संकलन असणारा दूध संघ आज भंगारात जमा झाला आहे. जमीन विकली आहे, या संघाच्या मशिनरी विकायला काढल्या आहेत. हा फलटणचा दूध संघ आज शून्य लिटरवर आणून ठेवला आहे, असा आरोपही निंबाळकरांनी रामराजे गटावर केला.
माजी खासदार निंबाळकर म्हणाले, श्रीराम सहकरी साखर कारखाना शोषून शोषून तो आवाडेंच्या ताब्यात तुम्ही दिला. रिझर्व्ह बॅंकेने मालोजीराजे बॅंकेवर निर्बंध लावले, तेथील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली. तुमच्याकडे असणारा खरेदी विक्री संघ गायब आहे, त्याचं आता अस्तित्वच नाही. मार्केट कमिटीत सुरुवातीला ठेवी किती होत्या आणि आता परिस्थिती काय आहे. आता सहा महिन्यांचे पगार द्यायाला पैसे नाहीत. तुम्ही दुसऱ्यांच्या संस्थांवर बोलण्याऐवजी स्वतःच्या संस्थांमध्ये काय चालले आहे, याचा विचार करा.
तुम्ही जलसंपदा खात्याचे मंत्री होता. पण, फलटणच्या पाण्याचे काय झाले; म्हणूनच तुम्हाला घरी पाठविण्याचा निर्णय फलटणच्या तरुण पिढीने घेतला आहे. तुम्ही कितीही अवसान आणले की नीरा देवघर, डोम बलकवडी मी केलं. पण आता खोटं विकलं जाणार नाही. जेवढे दिवस तुमचा टाईम होता, तेवढं दिवस तुम्ही खोटं विकलं, असेही निंबाळकर म्हणाले.
ते म्हणाले, तुमचे पराक्रम फलटण तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला माहिती आहेत. तुम्ही श्रीराम काखाना भाड्यानं दिला तो दिला. पण फलटणचं हक्काचं पाणीसुद्धा तुम्ही 30 वर्षे भाड्यानं दिलं होतं. रणजितसिंह नाईक निंबाळकरने ते पाणी ताकदीने माघारी आणले आहे. फलटण तालुक्यात सध्या ठिकठिकाणी कॅनॉलचे काम सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.