ZP Election : महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेची ७३ गट आणि १४६ गणांची अंतिम प्रभाग रचना देखील प्रसिद्ध झाली. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत गट आणि गणांमध्ये घट झाल्याने आरक्षण देखील बदलणार आहे. या संदर्भात अंतिम निर्णय ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग घेणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर तब्बल २१७ हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यावर संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविण्यात आला.
त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना अहवाल सादर केल्यानंतर हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ११५ हरकती आणि सूचना मान्य करण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांनी सुचवलेले बदल करून, सुधारित आराखडा पुन्हा त्यांच्याकडे पाठवला. विभागीय आयुक्तांनी सुचविलेले बदल तपासल्यानंतर प्रभाग रचनेला मान्यता दिली. त्यानुसार अंतिम रचना शुक्रवारी प्रसिद्ध झाली.
गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत ७५ गट व १५० गण होते. यंदा दोन गट व चार गण कमी झाले आहेत. त्यामुळे आरक्षणात बदल होणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणनुसार आरक्षणाची पुर्नरचना होणार आहे. याबाबत ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. अंतिम आरक्षण आल्यानंतर सोडत पद्धतीने ते लागू करण्यात येणार आहे.
अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून अंदाज बांधत कार्यकर्त्यांच्या बैठका देखील घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आरक्षणाच्या अंतिम घोषणेची अद्याप प्रतीक्षा असल्याने अनेकांनी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणे टाळले आहे. जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवरील मतदार संघटन बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी अशी निवडणूक होणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार हे निश्चि त नाही. त्यामुळे इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी करताना काळजी घेतली जात आहे. पक्ष चिन्हांचा वापर न करता बॅनरबाजी करत आपण निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचा संदेश दिला जात आहे. दरम्यान, युती आणि आघाडी झाली तर आपल्याला कोणाकडून संधी मिळेल याची चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीकडे इच्छुकांचा अधिक कल दिसतो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.