Rahul Narwekar Mistake : मी काही बोलणार नाही, पुन्हा सनद रद्द होईल..; राहुल नार्वेकरांना असीम सरोदे यांचा जहरी टोला

Rahul Narwekar Marathi Mistake Row Asim Sarode Reacts : विधानसभा सभागृहात शोकप्रस्तावाचा मराठी मजकूर वाचताना झालेल्या सलग उच्चार चुकांमुळे मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर राहुल नार्वेकर यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
Rahul Narwekar Marathi mistake controversy
Rahul Narwekar Marathi mistake controversySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha News: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुरी नार्वेकर हे सध्या जोरदार टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विधानसभा सभागृहात शोकप्रस्तावाचा मराठी मजकूर वाचताना झालेल्या सलग उच्चार चुकांमुळे मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या वादात आता विधितज्ज्ञ असीम सरोदे यांनीही उपरोधिक शैलीत जोरदार निशाणा साधला आहे.

अ‍ॅड. असीम सरोदे यांनी आपल्या एक्स पोस्टमधून राहुल नार्वेकर यांना चांगलेच डिवचले. त्यांनी उपहासात्मक शब्दांत लिहिले की, राहुल नार्वेकर यांनी कितीही चुका केल्या तरी मी काहीही बोलणार नाही… पुन्हा माझी वकिलीची सनद रद्द होईल. त्यांच्या या एका वाक्याने सोशल मीडियावर (Social Media) मोठी चर्चा रंगली आहे.

पुढे सरोदे यांनी आणखी जहरी टीका करत म्हटले की, राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आहेत ते… त्यांना वाटेल तेव्हा कुणाकडूनही काहीही लिहून घेतील. ते संविधानाचा अपमान करतील, कायदेशीरतेचा अपमान करतील, भाषेचाही अपमान करतील… पण त्यांचे कुणी काही बिघडवू शकत नाही. आणि नंतर सभागृहात सर्वांना शहाणपण शिकवायलाही ते तयार असतात.

वादाची सुरुवात झाली ती प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाबाबत विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावामुळे. हा गंभीर मजकूर वाचताना राहुल नार्वेकर यांनी अनेक शब्दांचे चुकीचे उच्चार केले. ‘यथोचित’ ऐवजी ‘यशोचित’, ‘दुर्दम्य इच्छाशक्ती’ ऐवजी ‘दुर्दमय इच्छाशक्ती’, तर ‘आशा’ या नावाचा उच्चार ‘अशा’ असा केल्याने सभागृहाबाहेर संताप व्यक्त होऊ लागला.

इतकंच नाही, तर ‘हृदया सिंहासनी’ या शब्दांचाही चुकीचा उच्चार झाला. दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या असे म्हणण्याऐवजी ‘दीनदयाळ मंगेशकरांच्या कन्या’ असा उल्लेख करण्यात आला. तसेच ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या नावाचाही चुकीचा उच्चार झाल्याने हा संपूर्ण प्रकार अधिकच वादग्रस्त ठरला.

स्क्रिप्टवरून चर्चा रंगली

या सर्व प्रकारानंतर आता राजकीय वर्तुळात नवा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल नार्वेकर यांनी या चुका स्वतः केल्या की त्यांना चुकीची स्क्रिप्ट देण्यात आली होती? काही जण जुन्या घटनांचे दाखले देत, मूळ मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी वेगळी स्क्रिप्ट दिली गेली होती का? असा संशयही व्यक्त करत आहेत.

राज ठाकरेंचा संताप

दरम्यान, राज ठाकरे यांनीही या संपूर्ण प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट घणाघात करत म्हटले की, हा आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव नव्हता, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव होता. राज ठाकरे पुढे म्हणाले, कागदावर लिहून दिलेलं मराठीही विधानसभा अध्यक्षांना व्यवस्थित वाचता येत नाही, हे संतापजनक आहे. पण त्या वेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील एकाही आमदाराने यावर आक्षेप घेतला नाही, हे अधिक धक्कादायक आहे.

मराठी भाषेची खिल्ली उडवली

केंद्र सरकार आणि परप्रांतीयांच्या माध्यमातून मराठी भाषेवर दबाव वाढत असताना आता राज्याच्या सर्वोच्च विधिमंडळातच मराठीची अशी दुर्दशा होत असल्याबद्दल राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी मराठी जनतेला आवाहन करत म्हटले की, आपण कोणत्या प्रकारच्या लोकांना निवडून देतो आहोत, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे एक गोष्ट पुन्हा चर्चेत आली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेचा सन्मान राखला जातोय की तिचीच खिल्ली उडवली जात आहे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com